मुंबई-बँकिंग व गुंतवणुकीसंबंधी मानांकन देणारी ‘मूडीज’ या संस्थेने भारतातील १५ बँकांना धोक्याचा इशारा दिला आहे. या बँकांच्या बुडीत कर्जांच्या (एनपीए) प्रमाणामुळे हा इशारा देण्यात आला असून यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक आदी बँकांचा समावेश आहे.
सीआरआर मानांकन
यातील बहुतांश बँका या तोट्यात असल्याने ‘मूडीज’ने त्यांना अपेक्षेप्रमाणे काऊंटर पार्टी रिस्क रेटिंग्ज (सीआरआर) हे मानांकन दिले आहे. बुडीत कर्ज वाढत असल्याने तसेच थकीत कर्जांची योग्य प्रमाणात वसुली होत नसल्याने या बँका अडचणीत आल्या आहेत. थकीत कर्जांची पुरेशी वसुली न झाल्यास या बँकांच्या तोट्यात आणखी वाढ होईल, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे. मात्र या ताज्या मानांकनात अॅक्सिस बँक, बँक ऑफ बरोडा आणि आयसीआयसी बँकांची स्थिती काहीशी वधारली आहे. दरम्यान, केंद्र सरकारचा पाठिंबा व चांगल्या वसुलीमुळे आमच्या बँकेची स्थिती सुधारत आहे, अशी प्रतिक्रिया पंजाब नॅशलन बँकेने व्यक्त केली.