मूर्खांचे एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस – अमित शाह

0

नवी दिल्ली : कोरेगाव- भीमा हिंसाचार प्रकरणात नजरकैदेत असणाऱ्या पाच विचारवंतावर पुणे पोलिसांनी राजकीय हेतूने कारवाई केलेली नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटकरुन राहुल गांधींवर निशाना साधला आहे. मूर्खांचे एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस असल्याचे सांगत शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.

कोरेगाव- भीमा हिंसाचाराप्रकरणी नजरकैदेत असलेल्या पाच विचारवंतांची सुटका करावी आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी रोमिला थापर यांच्यासह काही जणांनी केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज शुक्रवारी निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने हा निर्णय दिला. पाचही विचारवंतांना कोणत्याही राजकीय हेतूने अटक करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची गरज नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाना साधला. मूर्खांसाठी काँग्रेस हे एकमेव ठिकाण आहे. भारताचे तुकडे करणाऱ्यांचे, माओवाद्यांचे, बोगस सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बदनाम करायचे. राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये तुमचे स्वागतच आहे, असे खोचक ट्विटकरुन त्यांनी राहुल गांधींवर हल्ला चढविला.

राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी विचारवंतांच्या अटकेवरुन भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. भारतात फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या समाजसेवी संस्थेला स्थान असून अन्य सामाजिक संस्था बंद करायच्या. सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करायची आणि जे तक्रार करतील त्यांची हत्या करायची, ‘न्यू इंडिया’ त स्वागत आहे, असे ट्विट राहुल गांधींनी केले होते. यावर अमित शाह यांनी ट्विरद्वारे निशाना साधत पलटवार केला आहे.