मू.जे.महाविद्यालयात मतदार नोंदणी

0

जळगाव। तरूण व पात्र मतदारांच्या नोंदणी मोहिमेस येथील मुळजी जेठा महाविद्यालयात तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 1 ते 31 जुलै दरम्यान तरूण व पाञ मतदारांची नोंदणी करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतर्गत अधिकाधिक तरूणांची नावनोंदणी होण्यासाठी 8 व 22 जुलै रोजी विशेष मोहीम राबविण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे. त्यानुसार आज येथील मुळजी जेठा महाविद्यालयात तरूण व पाञ मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

पात्र मतदारांकडून नाव नोंदणीला सुरूवात
यावेळी उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, तहसीलदार अमोल निकम, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार रूपाली काळे, महाविद्यालयाचे निवडणूक नोडल ऑफिसर प्रा.एल.पी. वाघ उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी जलज शर्मा यांनी नवमतदारांना मतदानाचे महत्व समजावून सांगून नावनोंदणीचे आवाहन केले. मतदार नोंदणीची आवश्यकता आणि पध्दतीबाबत तहसीलदार निकम आणि प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नव मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी ध्वनीचिञफित आणि पथनाट्य दाखविण्यात आले. नव मतदारांच्या शंकाचे निरसन होण्यासाठी प्रश्नोत्तरे घेण्यात आली. यावेळी तरूण व पाञ नव मतदारांकडून नावनोंदणीचे फॉर्म भरून घेण्यात आले. यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.