जळगाव : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त मू.जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विचारांचे अभिवाचन केले. यात प्रमोद राऊत याने ‘एपीजेंची जडणघडण’, वर्षा उपाध्ये हिने ‘प्रज्वलित मने’ या पुस्तकातील ‘आदर्शांच्या शोधात’ या लेखाचे अभिवाचन केले. तसेच प्रा. गोपीचंद धनगर यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘आई’ विषयीच्या कवितेचे भावपूर्ण वाचन केले. कविता वाचन शामल रामशे, निलेश लोहार, महेश सूर्यवंशी यांनी स्वरचित कविता सादर केल्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली. मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी भारतरत्न डॉ.. ए.पी.जे., अब्दुल कलाम यांच्या जीवन व कार्याविषयी विद्यार्थ्याशी संवाद साधला.
यावेळी आठवड्यातून एक तास ‘वाचू आनंदे’ हा पुस्तक चर्चेचा उपक्रम सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी प्रा. योगेश महाले, डॉ. अतुल पाटील व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. तर सूत्रसंचालन वर्षा उपाध्ये या विद्यार्थिनीने केले.