मृत्यूच्या ‘दारा’तून सहा तासांनी सुटका

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – शेतीत नुकसान केल्याच्या रागातून एका वानराला मरेपर्यंत मारणार्‍या माथेफिरूंचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुक्या प्राण्यांचा छळ करून त्यांचे हाल करणारी माणसे जशी आपल्याला पाहायला मिळतात. तशीच या प्राण्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून सुटका करणारी माणसेही या जगात आहेत. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी एक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये अनुभवायला मिळाली. एका लोखंडी प्रवेशद्वारामध्ये डोके अडकलेल्या कुत्र्याची सोडवणूक करून नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. तब्बल सहा तासानंतर हा कुत्रा अक्षरशः मृत्यूच्या दरवाजातून सुखरूपपणे परत आला.

निगडी स्मशानभूमीतील घटना
निगडी येथे असलेल्या स्मशानभूमीच्या लोखंडी प्रवेशद्वारामध्ये एका कुत्र्याचे डोके अडकून बसले. त्याने डोके सोडविण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले पण त्यामध्ये तो यशस्वी झाला नाही. रात्री केंव्हातरी हा प्रकार घडल्याने त्याच्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. रात्रीच्या थंडीत बिचारा हा कुत्रा या अवस्थेत सहा तास विव्हळत होता. सुदैवाने मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या कुत्र्याची मान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये यश आले नाही. या कुत्र्याला नीट श्‍वासही घेता येत नव्हता, त्यामुळे त्याला आधी पाणी देण्यात आले आणि खायला दिले. पण बिचारा कुत्रा खाण्याच्या मनस्थितीत नव्हता. कारण त्याला या संकटातून सुटका हवी होती.

दरवाजा कापला आणि सुटका झाली
अखेरीस हॅक्सॉ ब्लेडच्या साहाय्याने सावधगिरीने कुत्र्याला इजा न होता दरवाजाचा लोखंडी तुकडा कापल्यानंतर या श्‍वान महाशयांची सहा तासानंतर सुटका झाली. या परिसरातील नगरसेवक सचिन चिखले आणि इतर तरुणानी या श्‍वानाची सुखरूप सुटका केली. सुटका झाल्यावर कुत्र्याचा जीव भांड्यात पडला. त्याने नक्कीच आपली सुटका करणार्‍यांचे मनोमन आभार मानले असणार.