मृत्यूपूर्वी तरुणाने केला होता जामनेरच्या मित्रांना व्हिडीओ कॉल

0

रामदेववाडी शिवारातील घटना ; लुटमारीतील संशयित चौघांची नावे निष्पन्न

जळगाव – शिरसोली-वावडदा रस्त्यावर एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील दिलीप पाटील व त्यांच्यासह पत्नीवर हल्ला करुन लूटमारीची घटना गुरुवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली होती. पोलिस ताफा घटनास्थळी पोहचून हल्लेखोरांचा माग घेत घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर बळीराम आघाडू भिल वय 28 याचा मृतदेह आढळून आला होता. बळीराम याने मृत्यूूपूर्वी जंगलात फिरत असतांना त्याच्या जामनेर येथील मित्रांना व्हिडीओ कॉल केला होता व हाच व्हिडीओ मित्रांना मोबाईलव्दारे पाठविल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी हा व्हिडीओ ताब्यात घेतला आहे. तसेच लुटमारीच्या घटनेतील चौघांची नावे निष्पन्न केले असल्याची माहिती मिळाली आहे.

शिरसोली ते वावडदा दरम्यान रामदेववाडी गावा जवळ भर दुपारी दुचाकी अडवून दाम्पत्याला लूटल्याची घटना घडली. जखमी दाम्पत्याला जिल्हारुग्णालयात दाखल केल्यावर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह अधिकारी कर्मचारी श्‍वान पथके, पोलिस अधीकारी, डीबी कर्मचारी माळरानावर गवतातून पळालेल्या चोरांचा मार्ग शोधत असतांना अगदी पाचशे मिटर अंतरावर नेव्हरे शिवारात बळीराम भिल याचा मृत्यु नेमका कशाने झाला आहे याचा पोलिस शोध घेत आहे.

तीन मिनिटे मारल्या मित्रांशी गप्पा
मृत्यूपूर्वी बळीराम याने मित्र अजय सजन गायकवाड रा. एकलव्य नगर, जामनेर या मित्राला व्हिडीओ कॉल केला होता. या कॉलमध्ये तो अजयसह त्याच्या मित्रासोबत बोलतांना दिसून येत आहे. व्हिडीओ बोलण्याचा आवाज येत नसल्याने नेमका काय संवाद झाला हे कळू शकलेले नाही. तीन मिनिट व 5 सेंकद त्याने दोघांशी गप्पा मारल्या. यानंतर काही वेळाने बळीरामच्या मृत्यूचीच बातमी मित्रांना कळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

…तर मृत्यूचे कारण होईल स्पष्ट
बळीराम याचा मृत्यू नेमका कसा झाला हे कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. त्याच्या अहवालानंतर नेमका मृत्यू कसा झाला हे कळेल. व्हिडीओमध्ये बळीराम सोबत आणखी दोघे जण दिसून येत आहेत. संबंधित दोघांना ताब्यात घेतल्यावर नेमका मृत्यू कसा झाला हे समोर येणार आहे.

लुटमारीतील संशयितांची नावे निष्पन्न
लुटमारीच्या घटनेच्या अनुषंगाने व्हिडीओ महत्वाचा ठरु शकतो हे लक्षात घेवून पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, प्रविण मांडोळे, निलेश पाटील, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, सचिन पाईल, सचिन देशमुख यांचे पथकाला सुचना केल्या. पथकाने व्हिडीओसह तसेच व्हिडीओ असलेल्या दोघा मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. यानंतर पुन्हा पथकाने दिवसभर शिरसोलीसह रामदेवी शिवारात संशयितांसाठी शोध मोहिम राबविली. फिर्यादीच्या वर्णनानुसार पथकाने चौघा आरोपींची नावे निष्पन्न केले असून लवकर पोलीस त्यांच्या मुसक्या आवळणार आहे. यानंतरच बळीरामच्या मृत्यूचा तसेच लुटमारीच्या घटनेचा पर्दाफाश असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.