मृत प्राण्यांवर होणार विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार

0

पुणे । शहरात मृत पावणार्‍या प्राण्यांची यापुढी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचा अभिप्राय महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे.

महापालिकेच्या हद्दीत हजारो पाळीव आणि भटके प्राणी मृत्युमुखी पडतात. पिंपरी चिंचवड महापालिकेने मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. पुण्यात मात्र अशी कोणतीही सोय नसल्याने आरोग्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी विशेष विद्युतदाहिनी उभी करण्याचा प्रस्ताव मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी ठेवला होता. त्यासाठी प्रशासनाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता.

मुंढव्यात प्लॅन्ट
या अभिप्रायाचे अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या स्वाक्षरीने उत्तर देण्यात आले आहे. त्यामध्ये मुंढवा केशवनगर सर्व्हे क्रमांक 9 ते 14/2 या ठिकाणी मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेरेतर प्लॅन्ट उभारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा प्लँट लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यामुळे मृत प्राण्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावता येणार असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.

अंतरंग पालिकेचे – नेहा सराफ

खासदार शिरोळेंचे वर्चस्व वाढणार ?
सलग दुसर्‍यांदा निवडून आलेले खासदार अनिल शिरोळे शहरात अत्यंत मितभाषी म्हणून ओळखले जातात. पण सध्या शहरातील परिस्थिती बघता त्यांचे वर्चस्व वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. फेब्रुवारीत महापालिकेत भाजपला सत्ता देत पुणेकरांनी भाजपाला केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर त्रिवार यश दिले. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मोदी लाटेमुळे शिरोळे निवडून आले, असे मत भाजपमधील काही जणांचे आहे. मात्र त्यानंतर सध्या शिरोळे यांच्या हालचाली बघितल्या तर निवडून येण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचीही मदत झाली असणार यात शंका नाही.

गेले 20 वर्ष राजकीय क्षेत्रात वावरणार्‍या शिरोळे यांचे एखादे वादग्रस्त वक्तव्य किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण अजून तरी समोर आलेले नाही. केंद्राच्या अख्यारीत एखादा विषय असेल तर त्याचा पाठपुरावा करताना दिसले. इतकेच काय तर राज्यमंत्री किंवा खुद्द मुख्यमंत्री आल्यावर संबंधित कार्यक्रमांना ते हजर असतीलच असे नाही. पण केंद्रातून एखादा खासदार किंवा मंत्री आल्यास ते आवर्जून हजर असतात. त्यामुळे दुसर्‍याच्या सीमेत नाक खुपसून लुडबुड करण्यापेक्षा आपले काम करण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. हे सगळ एकाबाजूने सुरू असताना पीएमपीएमएलसाठी तुकाराम मुंढे यांना आणणारे दुसरे-तिसरे कोणी नसून तेच आहेत. हे सर्व शहराला माहिती आहे. भाजपच्या महापौर आणि पदाधिकारी यांच्या भूमिकेला तात्विक (जाहीर नव्हे) विरोध करून त्यांनी मुंढेंना पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर महापालिकेसाठी चांगला आयुक्त आणण्यासाठी ते प्रयत्नात असल्याचे समजते. त्यांचे कार्यक्षेत्र जरी केंद्रात असले तरी शहराशी निगडीत महत्वाचे निर्णय त्यांच्यामार्फत घेतले जातात. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या शब्दाला वजन आहे. आठ आमदारांपैकी पालकमंत्री बापट आणि राज्यमंत्री कांबळे त्यांच्या कामात व्यस्त असतात. महापालिका निवडणुकीत अचानक अ‍ॅक्टिव्ह झालेले काकडेही आता थंडावले आहेत. माधुरी मिसाळ वगळता बाकीच्यांचे दर्शनही पुणेकरांना दुरापास्त झाले आहे. शहराच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांचे उत्तर थेट वर्षा बंगल्यावरून येते. त्यामुळे आधीच आमदारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दुसरीकडे सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नाही. त्यामुळे तिकडूनही पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी लोकप्रतिनिधींचा कस लागतो आहे. हा सर्व प्रकार बघता शहराच्या नेतृत्वासाठी कोणाचा तरी चेहरा वापरावा लागणार आहे.

दोन वर्षात पुन्हा लोकसभा निवडणुका येणार आहेत. त्यावेळी बापट, काकडे किंवा महापौर टिळक यांचा चेहरा न वापरता ब्राह्मण्येत्तर आणि सुसंस्कृत म्हणून शिरोळे यांचा चेहरा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे ससाच्या वेगाने शहरातील काही नेते मदमस्तपणे वर्चस्वाच्या शर्यतीत पळत असले तरी कासवाच्या गतीने चालणारे शिरोळे ही शर्यत जिंकतील हे त्यांनाही कळणार नाही.