भुसावळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ; वरणगाव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासह रखलेल्या प्रकल्पांना गती देण्याची ग्वाही : मुख्यमंत्री उवाच : पुलवामा हल्ल्याचा बदला घेणार, पाकिस्तानमधील लपलेल्या बापांची खैर नाही ; वरणगाव एसआरपीएफ केंद्राचे कामही लागणार मार्गी
भुसावळ- मेगा रीचार्ज योजनेचा सहा हजार कोटींचा डीपीआर सादर करण्यात आला असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंजुरी देणार असून या योजनेचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याने या परीसराचा निश्चित कायापालट होईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. राहुरी कृषी विद्यापीठाचे लवकरच विभाजन केले जाणार असून माजी मंत्री खडसे यांनी मांडलेल्या प्रश्न लवकरच निकाली काढले जातील तसेच वरणगाव एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा प्रश्नही मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी येथे दिली. खासदार रक्षा खडसे यांच्या ‘समर्पण’ या कार्यवृत्तांताच्या प्रकाशन सोहळा गुरुवारी दुपारी दिड वाजता आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) वर झाला. प्रसंगी आयुष्यमान भारत योजनेच्या पाच लाभार्थींना गोल्ड कार्डच्या वाटपासह सावद्यासह निंभोरा व बोदवड येथील प्रस्तावीत रेल्वे ब्रीजचे, नगरपालिका उद्यानासह प्रशासकीय ईमारतीचे व आमदार निधीतील उद्यानाचे तसेच भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे रीमोटद्वारे मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
रक्षा खडसे तरुण व कार्यक्षम खासदार
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपात स्व.रामभाऊ म्हाळगींनी आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशीत करण्याची परंपरा सुरू केली. खासदर रक्षा खडसे यांनी भाजपाच्या परंपरेला साजेसा अहवाल सादर केला आहे. भाजपाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी असला पाहिजे. पाच वर्षात त्याने काय काम केले याचा लेखाजोखा त्याने मांडला पाहिले. खासदार खडसे या तरुण व कार्यक्षम खासदार आहेत. खासदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गावे असल्याने 50 टक्के गावातही ते पोहोचू शकत नाही तर काही खासदार असेही आहेत की जे चार ते पाच वेळा निवडून आले मात्र मतदारसंघात पोहोचलेलेच नाहीत मात्र रक्षा खडसे त्यास अपवाद असून तब्बल 95 टक्के मतदारसंघात त्या पोहोचल्या आहेत व उर्वरीत ठिकाणी त्यांनी कामे केली आहेत. मुळात वर्षातून चार महिने खासदार संसदेत असतात तर उर्वरीत वेळी कार्यक्रमांना हजेरी व लोकसंपर्कात असतात त्यामुळे खडसे यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
मेगा रीचार्जने भाग्य बदलणार
मुख्यमंत्री म्हणाले की, मेगा रीचार्ज स्कीमने या परीसराचे भाग्य बदलणार आहे. जगातले आठवे अजुबा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा हजार कोटींचा डीपीआर सादर करण्यात आला असून त्यास मान्यता देण्याची पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींनी ग्वाही दिली आहे. वरणगाव पोलिस प्रशिक्षण केंद्राऐवजी एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या कामालाही चालना देणार असल्याचे ग्वाही देत ते म्हणाले की, देशातील 45 टक्के कुटुंबाना घर नसल्याने पंतप्रधानांनी स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी देशातील एकही नागरीक बेघर राहणार नाही त्यासाठी पंतप्रधान आवास योजना आणली असून 2011 च्या यादीत ज्यांची नावे सुटली त्यांचे सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी सांगत भुसावळातील पाच हजार बेघरांना हक्काचे घरे मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शुक्रवारच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगत प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थी कामगार असल्यास व त्याची कामगार कल्याण मंडळात त्याची नोंदणी असल्यास जादा दोन लाख रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जगातील सर्वात मोठी आयुष्यमान योजना
मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार गरीब, सर्वसामान्यांसाठी काम करीत असून आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत मदत केली जात आहे. या रकमेतून रुग्णांना औषधी, ओपीडी, शस्त्रक्रिया केली जाणार असून जळगाव जिल्ह्यात साडेचार लाख गोल्ड कार्ड दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. अमेरीकेतील योजनेत केवळ दहा कोटी नागरीकांना सामावून घेण्यात आले मात्र भारतात 50 कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगत आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 19 लाख लोकांनी शस्त्रक्रिया केल्याचे ते म्हणाले. शेतकर्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतले असून शेतकर्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये येणार असल्याचे ते म्हणाले. असंघटीत कामगारांसाठी कुठलीही योजना नव्हती मात्र योजना तयार करण्यात आल्यांतर 12 कोटी लोकांना त्याचा लाभ देण्यात येत असून 60 वर्षानंतर या कामगारांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार असल्याचे सांगून त्यांनी मनमोहन सिंग सरकारच्या कर्जमाफी योजनेवर टिका केली.
दहशतवाद्यांच्या बापांची खैर नाही
फडणवीस म्हणाले की, पुलवामा हल्ल्यातील एकेका शहिदाच्या मृत्यूचा बदला घेतला जाणार असून हे बलिदान वाया जाणार नाही, त्याचे मोल चुकवावे लागेल, काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या पाकिस्तानमधील लपलेल्या बापांची खैर नाही, त्यांना शोधून त्यांचा खात्मा केला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले की, हा नरेंद्र मोदींचा भारत आहे, सेनेला खुली सुट दिली असून त्यांना थांबवले जाणार नाही, भारताची सेना मजबूत असून गतकाळात पाकिस्तात घुसून त्यांचे अड्डे नष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले. देशवासीयांनी आता शहिदांच्या कुटुंबियांशी पाठिशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी करीत पंतप्रधान मोंदीच्या नेतृत्वात आगामी काळात भारत निश्चित पुढे येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.