‘मेट्रो’चा पर्यायी मार्गांचा शोध सुरूच

0

पुणे : आगाखान पॅलेससमोर मेट्रोच्या बांधकामाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे  कॉर्पोरेशन’कडून (महामेट्रो) अद्याप पर्यायी मार्गांची चाचपणी सुरू आहे. पर्यायी मार्गांवरील अपेक्षित प्रवासीसंख्या आणि त्यामुळे वाढणारा खर्च, याचा ताळमेळ घालण्याचे काम सध्या सुरू असून येत्या काही दिवसांत त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे संकेत ‘महामेट्रो’ने दिले.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने गेल्या सप्टेंबरमध्ये आगाखान पॅलेससमोर शिवाजीनगर ते रामवाडी (रिच-3) मेट्रोच्या बांधकामाला परवानगी देण्याचा ‘महामेट्रो’चा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर, ‘महामेट्रो’ने मार्गात बदल करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू केला असला, तरी अजूनही त्याला अंतिम स्वरूप दिलेले नाही.

मार्ग बदलामुळे खर्चातही वाढ

‘मेट्रो’च्या मार्गात बदल केल्यास प्रवासीसंख्येवर काय परिणाम होईल, याचा अभ्यास केला जात आहे. मार्ग बदलामुळे मेट्रो खर्चातही वाढ अपेक्षित असून, त्याचा आढावा घेण्यात येत आहे. मेट्रोपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावे, अशादृष्टीने पर्यायी मार्ग निश्‍चित केला जाणार असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ‘महामेट्रो’चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-3) प्रकाश वाघमारे आणि महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे यांनी दिली.

रामवाडीकडून कामाला सुरुवात

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर धान्य गोदाम ते रामवाडी दरम्यानच्या मार्गिकेचे पहिल्या टप्प्यातील काम राजा बहादूर मिल रस्त्यावर सुरू केल्यानंतर आता रामवाडीच्या बाजूने सोमवारपासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. जलद बस वाहतुकीच्या (बीआरटी) मार्गिकेमध्येच हे काम केले जाणार असल्याने रस्त्यावरील वाहतुकीला त्याचा अडथळा होणार नसल्याचा दावा वाघमारे यांनी केला. रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या सेगमेंटच्या निर्मितीसाठी वाघोलीजवळ ‘कास्टिंग यार्ड’ची जागा निश्‍चित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

15 दिवसांमध्ये कंत्राटदारांची निवड

शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गापैकी बुधवार पेठ (फडके हौद) स्टेशनपर्यंतचा पहिल्या टप्प्याच्या निविदांची छाननी प्रक्रिया पूर्ण होत आली असून, आगामी 15 दिवसांमध्ये पात्र कंत्राटदारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती ‘महामेट्रो’च्या भुयारी विभागाचे अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक राजेश जैन यांनी दिली. पात्र कंत्राटदाराची निवड झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व यंत्रणा सज्ज होईल आणि नव्या वर्षात या मार्गाचे काम सुरू होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला.

पुन्हा चक्राकार वाहतूक?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अभिनव चौकातील (नळस्टॉप) दुहेरी उड्डाणपुलाचे भूमिपूजन केल्यानंतर आता या ठिकाणच्या कामाला सुरुवात करण्याचे ‘महामेट्रो’ने ठरविले आहे. त्यासाठी, येत्या मंगळवारी अभिनव चौक-एसएनडीटी कॉलेज-आठवले चौक दरम्यानच्या प्रस्तावित चक्राकार वाहतुकीच्या पर्यायाची तपासणी वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते करणार आहेत. वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यास मेट्रोच्या कामासाठी चक्राकार वाहतूक सुरू करण्यात येणार आहे, असे ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.