पुणे : शहरामध्ये मेट्रो रेल प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. परन्तु मध्यवस्तीतील कसबा पेठेतील रहिवाशांचा प्रस्तावित मेट्रोच्या भुयारी मार्गाला विरोध आहे. महामेट्रो कंपनीने भुयारी मार्गाचे काम येत्या महिनाभरात सुरू होईल असे जाहीर केल्याने पेठेतील रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पौड रस्त्यावरील वनाज कॉर्नर ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट असे दोन मार्गाचे काम सध्या चालू आहे. यातील पिंपरी ते स्वारगेट मार्ग वादात सापडला आहे. प्रकल्पाच्या नियोजित मुदतीपेक्षा दोन वर्षे विलंबाने काम चालू झाले आणि कसबा पेठेतील रहिवाशांच्या विरोधामुळे ते लांबण्याची शक्यता अधिक आहे.
कसबा पेठेतील फडके हौद आणि परिसरातील रहिवाशांना महामेट्रो कंपनीची पत्रे पाठविण्यात आली असून लोकांना मते मांडण्यासाठी मेट्रो कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. यावेळी रहिवाशांचा विरोध उफाळून येईल अशी चिन्हे आहेत.
शिवाजीनगर गोडावून ते स्वारगेट पाच किलोमीटरचा मेट्रोचा मार्ग भुयारी आहे. या कामासाठी मेट्रो कंपनीने निविदा मंजूर केल्या आहेत, त्यानुसार महिनाभरात खोदाईचे काम सुरू होणार आहे.कसबा पेठेत साठ सत्तर वर्षे जुने वाडे आणि तीस – पस्तीस वर्ष जुन्या इमारती आहेत. खोदाईच्या कामाने वाडे पडतील आणि इमारतींना तडे जातील अशी भिती आहे. एक आणि दोन खोल्यांमध्ये वाडयात भाडेकरू राहातात, त्यातील बहुतेक छोटे व्यावसायिक आहेत. या प्रकल्प बाधीतांना उपनगरांत देऊ केलेल्या पर्यायी जागा सोयीच्या नाहीत. शिवाय फ्लॅटधारकांना मिळणारा मोबदला अपुरा वाटतो. या कारणाने तेही अस्वस्थ आहेत. भुयारी मार्गासाठी खोदाईचे काम शिवाजीनगर गोडावून आणि स्वारगेट अशा दोन्ही बाजूंनी एकदमच सुरु करण्यात येणार आहे.