पुणे : बहुचर्चित पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या 10.75 कि.मी. मार्गाचे काम हैदराबादच्या एन.सी.सी.लिमिटेड कंपनीला देण्यात आले असून, या मार्गाचे प्रत्यक्ष काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आलेे.
पिंपरी ते रेंजहिल्स या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कामासाठी 8 कंपन्यांनी तयारी दर्शवली होेती. यामध्ये टाटा प्रोजेक्ट, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जे. कुमार इन्फ्रास्टक्चर लिमिटेड, एनसीसी लिमिटेड, वालेंचा इंजिनिअरिंग लिमिटेड, आईटीपी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होता. यातील हैदराबादेतील एनसीसी लिमिटेड कंपनीला 499 कोटींना हे काम देण्यात आले आहे.
भुयारी मार्गाचे काम पुढील टप्प्यात
पुणे मेट्रोचे काम महामेट्रो अंतर्गत करण्यात येत आहे. हे काम तीन टप्प्यात करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्याचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. या मार्गात 7 स्थानके येणार आहेत. या मार्गावर मेट्रोची उभारणी जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटीएस) स्वतंत्र मार्गिकेवरच बहुतांश ठिकाणी केली जाणार आहे. त्यामुळे भूसंपादन किंवा इतर प्रक्रियेसाठीचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. रेंजहिल्सच्या पुढे स्वारगेटपर्यंतचा संपूर्ण मार्ग भुयारी असल्याने त्याचे काम नंतरच्या टप्प्यात केले जाणार आहे. रेंजहिल्सपर्यंतचे 10.75 कि.मी.च्या कामासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
संभाजी बागेत उभारणार प्रतिकृती
मेट्रो कशी असणार, याची उत्सुक्ता पुणेकरांना आहे. पुणे मेट्रोची प्रतिकृती साकारण्यासाठी महामेट्रोने संभाजी उद्यानात जागेची मागणी केली आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच पुणे मेट्रोचे दर्शन संभाजी बागेत पाहायला मिळणार आहे.
दुसर्या टप्प्यासही लवकरच प्रारंभ
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पुढील आठवड्यात चालू होणार असून, यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच रेंजहिल्स ते पिंपरी मेट्रो मार्गावर बॅरिकेटिंग केले जाणार आहे. तसेच, दुसर्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मार्गांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे त्या मार्गाचे कामही पुढील महिन्यात सुरू होणे अपेक्षित आहे.
ब्रिजेश दीक्षित, संचालक, महामेट्रो