मेट्रोच्या मार्गातील अतिक्रमणे तातडीने हटवा – डॉ. दीपक म्हैसेकर

0

सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज

पुणे : महामेट्रोचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. तसेच शासकीय जागेमधील मेट्रोच्या मार्गिकेवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या.

पुणे महामेट्रोच्या कामांचा आढावा बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, महामेट्रो पुणेचे रामनाथ सुब्रमण्यम, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, मेट्रोचे सहव्यवस्थापक प्रल्हाद कचरे, बी. एस. पर्‍हाड, एसआरएचे पांडुरंग पोले, कार्यकारी अभियंता विद्या मिलारकर, उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी-उंटावाल, प्रांताधिकारी ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे, पोलीस उपायुक्त पी. बी. ढमाले, आर. ए. सावंत उपस्थित होते.

मेट्रोच्या मार्गिकेवरील राजीव गांधी नगर, जुना तोफखाना आणि कामगार पुतळा येथील झोपडपट्टींच्या बाधित भागांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मेट्रोच्या कामावेळी शिवाजीनगर बसस्थानाकाच्या तापुरत्या स्थलांतरासाठी जागा शोधणे, तसेच मल्टिट्रान्सपोर्ट हबच्या बांधकामाच्यावेळी स्वारगेट बसस्थानकाच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी जागा शोधण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच शिवाजीनगर येथील भुयारी मेट्रो मार्गासाठीच्या एसटी महामंडळाच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. मेट्रोसाठी पुणे पालिकेच्या मालकीच्या आवश्यक जागांबाबतही चर्चा करण्यात आली. यांसह काही भागात पुरातत्व विभागाच्या ना-हरकत दाखला मिळणे आवश्यक आहे, याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.