मेट्रोतून वगळल्याने आंदोलन करणार : चेतन तुपे

0

हडपसर । राष्ट्रवादीची सत्ता असताना सहा प्रस्तावित मार्गात हडपसर पर्याय मेट्रो प्लॅनमधे घेतले असून पहिल्या टप्प्यात हे काम सुरू नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, मेट्रोचे सहाही मार्ग वेगळ्या बाजूला असल्याने एकावेळी मेट्रोचे काम सुरू करावे, पुणेकरांच्या वाहतूककोंडीचा प्रश्‍न गांभीर्याने सोडवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे. मात्र सत्ताधारी भाजपने बदल करून हडपसर वगळल्याने पुन्हा एकदा पूर्व भागावर अन्याय झाला आहे, हडपसरकरांच्या न्याय्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तुपे यांनी दिला आहे.

सत्ताधार्‍यांमुळे मेट्रोचे काम चार वर्षे उशिरा सुरू झाले आहे, पुणेकरांना वाहतूककोंडीच्या खाईत ढकलण्याचे काम सुरू आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता असताना शहरातील वाहतूककोंडी सुटावी म्हणून 85 किलोमीटर मेट्रो मार्ग मंजूर करून घेतला होता, यामध्ये पहिल्या टप्प्यात 31 किलोमीटर मेट्रोचे काम होणार होते, यात पिंपरी ते स्वारगेट व वनाज रामवाडी मार्गाचा समावेश होता. दुसर्‍या टप्प्यात कर्वेनगर, सिंहगड, हडपसर, कात्रज या मार्गाचे काम करण्यात येणार होते, मात्र सत्ताधारी भाजपने सत्तेवर आल्यावर प्रस्ताव बदलून भैरोबनाला वरून बंडगार्डनकडे मेट्रो वळविली आणि हडपसरला वगळल्याने पूर्व भागातील राष्ट्रवादी नगरसेवकांना धक्का बसला आहे.

आधी राष्ट्रवादीची पालिकेत सत्ता असताना हडपसरपर्यंत मेट्रो प्रस्तावित केली होती, पण भाजप सत्ताधार्‍यांनी हडपसर चे काम सुरू केले नाही, कात्रज वगळले होते पण राष्ट्रवादीच्या आग्रहास्तव कात्रजपर्यंत होत आहे, शिवाजीनगर व स्वारगेट, वनाज येथे मेट्रो स्टेशन होत आहे, स्वारगेट स्टेशन होत असताना हडपसरला मेट्रोचे काम सुरू करावे अशी आमची आग्रही मागणी असल्याचे चेतन तुपे यांनी सांगितले. स्वारगेट ते हडपसर व निर्धारित सर्व सहा मार्गांचे काम एकावेळी सुरू करावी अशी आग्रही मागणी तुपे यांनी केली आहे. भाजपने भैरोबनाल्यापर्यंत मेट्रो करून हडपसरकरांची शुद्ध फसवणूक केली आहे. असा आरोप करीत हडपसरला मेट्रो करत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हडपसर हे पुण्याच्या पूर्वेकडील पालिकेच्या शेवटच्या हद्दीतील उपनगर आहे, झपाट्याने वाढ होत असताना रस्ते व ट्रॅफिक समस्या गंभीर बनत चालली आहे, येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक आहे, खासगी वाहनांचा वापर त्यामुळे कमी होईल व वाहतूक समस्येवर मात करता येईल. भाजप संथ गतीने काम करीत आहे, एकावेळी सर्व मार्गांचे काम सुरू झाल्यास लवकर मेट्रो मार्ग होतील आणि पुणे शहर आणि उपनगर वाहतुक समस्या सुटण्यास मदत होईल. पूर्व भागावर कायम अन्याय झाला आहे आता मेट्रो वगळल्याने नागरिकांमध्ये संताप आहे, चुकीचे निर्णय घेण्याचा पायंडा भाजपने रचला आहे.
– चेतन तुपे, विरोधी पक्षनेते