मेट्रोने निगडीपर्यंत ‘डीपीआर’ महापालिकेकडे केला सादर

0
7 कि.मी. साठी पंधराशे कोटी खर्च अपेक्षित
पिंपरी-चिंचवड : पिंपरी  ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतच्या पुणे महामेट्रोच्या वाढीव सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अहवाल महामेट्रोने गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. त्या अहवालाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच सात किलोमीटर मार्गासाठी अंदाजे पंधराशे कोटी रुपये अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिकेचा वाटा 200 कोटी
पिंपरी-चिंचवड शहरात स्वारगेट ते  पिंपरी या मार्गावर पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासोबत पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत मेट्रो नेण्याची आग्रही मागणी शहरवासियांकडून केली जात होती. त्यानंतर महापालिकेने महामेट्रोला पिंपरी ते निगडीपर्यंत डीपीआर तयार करण्याचे निर्देश महामेट्रोस दिले होते. त्यानुसार महामेट्रोकडून डीपीआरचा अहवाल तयार केला आहे. गेल्या आठवड्यात तो अहवाल महापालिकेकडे सुपुर्त केला आहे. या संदर्भात माहिती देताना आयुक्त हर्डीकर म्हणाले की, पिंपरीपर्यंत महामेट्रोचे काम सुरु आहे.  पिंपरीच्या पुढे निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत मेट्रो नेण्यात येणार आहे. हे अंतर सुमारे 7 किलोमीटर असून, त्या प्रकल्पासाठी एकूण 1 हजार 500 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 200 कोटींचा खर्च पालिकेस करावा लागणार आहे. तर, अर्धा खर्च केंद्र व राज्य शासन पेलणार आहे. उर्वरित खर्च महामेट्रो विविध माध्यमातून उभा करणार आहे.