मेट्रोबरोबर बस, रेल्वेचा समन्वय!

0

पुणे । बस आणि रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांबरोबरच पायी जाणार्‍या व सायकल चालवणार्‍या नागरिकांसाठीही मेट्रो सोयीची व्हावी, यासाठी मेट्रो प्रकल्पात या सर्व वाहतूक यंत्रणांचा समन्वय घडवून आणणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यात पीएमपीएमएल आणि एमएसआरटीसी बस स्थानकांबरोबरच रेल्वेच्या स्थानकांवर उतरणार्‍या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी मेट्रो स्टेशन जवळ राहील, असा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेट्रो स्थानकांच्या रंगरुपातून पुण्याची ओळख प्रदर्शित व्हावी, असा प्रयत्न असून काही मेट्रो स्थानकांच्या छताचे डिझाईन पुणेरी पगडीशी मिळतेजुळते असेल, असेही महामेट्रोचे डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

रेल्वे स्थानके मेट्रोशी जोडण्यावर चर्चा
रेल्वे स्थानकांना मेट्रो स्थानक जोडण्यासाठीच्या करारावर बोलणी सुरू असल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली. यात प्रामुख्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उतरून मेट्रो स्थानकात प्रवेश करताना तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा समावेश असेल. विविध वाहतूक सेवा एकमेकांना जोडण्यासाठी नागपूरप्रमाणे पुण्यातही प्रवाशांसाठी ’कॉमन मोबिलिटी कार्ड’ अर्थात ‘मी कार्ड’ सुरू करता येईल का, यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. एकच कार्ड प्रवासाबरोबरच वाहनतळावर तसेच इतर खरेदीसाठीही वापरता यावे, अशी ही संकल्पना आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठीच्या अर्थसाहाय्यासंबंधी ’युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँके’चे प्रतिनिधी भेट देणार असल्याचेही डॉ. दीक्षित यांनी नमूद केले.

असे असेल वाहतूक यंत्रणांचे समन्वयीकरण
पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकेवर भोसरी मेट्रो स्थानक हे कासारवाडी रेल्वे स्थानकाला आणि त्याच भागातील बीआरटीएस बस थांब्याला जोडले जाईल. तसेच पीसीएमसीतील बहुमजली पार्किंगही जोडले जाईल. संत तुकाराम मेट्रो स्थानक, एमएसआरटीसी टर्मिनस आणि खडकी मेट्रो स्थानकाला, तसेच खडकी रेल्वे स्थानकाला जोडण्याचा विचार आहे. याच भागात बीआरटीएस बस थांबाही प्रस्तावित असून त्याद्वारे तिथे उतरणार्‍या प्रवाशांनाही मेट्रो स्थानक जवळ पडेल.शिवाजीनगर भुयारी मेट्रो स्थानक हे एमएसआरटीसी व पीएमपीएमएल बस यंत्रणेस जोडण्यात येईल, तसेच पादचारी पुलाद्वारे शिवाजीनगर रेल्वे स्थानकाशी जोडणी राहील. वनाझ ते रामवाडी मार्गिकेवर पुणे रेल्वे मेट्रो स्टेशन हे पुणे रेल्वे जंक्शनला आणि पीएमपीएमएल बस थांब्याला जोडले जाईल. तसेच येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी या मेट्रो स्थानकांचा बीआरटीएस बस थांब्यांशी समन्वय साधला जाईल. सिव्हिल कोर्टाजवळील पुणे मेट्रो स्थानक हे पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांसह पीएमआरडीए मेट्रो मार्गिकेसाठीचेही इंटरचेंज स्थानक आहे. हे इंटरचेंज स्थानक पीएमपीएमएल बस थांब्याला जोडले जाईल. स्वारगेटचे भुयारी मेट्रो स्थानक एमएसआरटीसी टर्मिनस आणि पीएमपीएमएल बस थांब्यास जोडले जाईल. या ठिकाणी सार्वजनिक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

685 झाडे तोडणार!
मेट्रो प्रकल्पासाठी एकूण 44 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, त्यापैकी 32 हेक्टर सरकारी जमीन आहे. या सरकारी जमिनीपैकी 16 हेक्टर जमीन पुणे मेट्रोला मिळाली असून उर्वरित जमीन मिळवण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. मेट्रोसाठी 685 झाडे तोडावी लागतील, अशी शक्यता असली तरी झाडे तोडावी लागू नयेत यासाठी शक्यतो प्रयत्न केले जात आहेत, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. यात झाडे काढून ती जशीच्या तशी दुसरीकडे लावणे, झाडे तोडण्याचा कालावधी शक्य तितका लांबवून त्या काळात एका झाडासाठी तीन वा अधिक नवीन झाडे लावणे, असे उपाय करण्यात येणार आहेत. झाडे लावण्यासाठी 12 हेक्टर जमीन मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.