पुणे । मेट्रो प्रकल्पासाठी शिवाजीनगर येथील गोदामाच्या जागेच्या बदल्यात पुणे स्टेशन येथील एसटी महामंडळाच्या 4 हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे शासकीय गोदामाच्या परिसरात असलेले नागरी सुविधा केंद्र, पुरवठा कार्यालये यांचे त्या ठिकाणी स्थलांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी शिवाजीनगर गोदामांच्या जागेचा आगाऊ ताबा देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार गोदामाची 2 हेक्टर 67 आर इतकी जागा प्रकल्पाला मिळणार आहे. हे आदेश देताना सरकारने या जागेवरील गोदामे, नागरी सुविधा केंद्र आणि पुरवठा कार्यालयांसाठी पर्यायी व्यवस्था महामेट्रोकडून त्यांच्या खर्चातून करावी, असेही आदेशात म्हटले आहे. सरकारच्या आदेशानुसार एका गोदामाचा ताबा लवकरच महामेट्रोला देण्यात येणार आहे.
पर्यायी जागेसाठी बैठक
जिल्हा प्रशासनाला पर्यायी जागा उपलब्ध होण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिकेचे आणि महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. या गोदामांमध्ये पुणे शहर आणि हवेली तालुक्यामधील नागरिकांसाठी नागरी सुविधा केंद्र, धान्य गोदाम, ईव्हीएम मशीन ठेवले आहे. पर्यायी जागा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेकडे चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
जागा त्वरित देण्याच्या सूचना
नागरिकांच्या सोयीसाठी नागरी सुविधा केंद्र आणि पुरवठा कार्यालये ही मध्यवस्तीमध्येच ठेवणे आवश्यक आहे. मध्यवस्तीत जागा नसेल तर या सर्व केंद्रांचे विकेंद्रीकरण करून शहर आणि उपनगरांमध्येही ही कार्यालये सुरू करण्यासाठी जागा देण्याचा विचार करावा, असे जिल्हा प्रशासनाने महापालिकेला सुचविले होते. जिल्हा प्रशासनाकडून धान्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये ठेवण्याचा विचार सुरू आहे. मात्र, सुविधा केंद्र व पुरवठा कार्यालयांसाठी शहरांच्या हद्दीत आणि नागरिकांना सोयीचे होईल, अशी जागा मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी जागा त्वरित देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी या बैठकीत महापालिकेला दिल्या होत्या.
महामेट्रोने एसटीला भाडे द्यावे
पुणे स्टेशन येथील एसटी महामंडळाच्या स्थानकालगत असलेली 4 हजार चौरस फूट जागा नागरी सुविधा केंद्रांना देण्याचा पर्याय पुढे आला. त्या जागेच्या मोबदल्यात एसटी महामंडळाला महामेट्रोने भाडे आदा करावे, असा पर्यायही मांडण्यात आला आहे. तर, मतदान यंत्र ठेवण्यासाठी वखार महामंडळाचे भोसरी येथील गोदामाची जागा निश्चित करण्याचा निर्णय झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.