मेट्रो स्टेशनला स्थानिकांचा विरोध

0

कसबा पेठेतील बाधितांचे आंदोलन; अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा

पुणे : एकीकडे शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसर्‍या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले, तर दुसरीकडे काही ठिकाणी याबाबतचा विरोध पाहावयास मिळत आहे. कसबा पेठेतील झांबरे वस्तीतील नियोजित मेट्रो स्टेशनला येथील नागरिकानी तीव्र विरोध केला आहे. गुरुवारी कसबातील नागरिकांनी आंदोलन करून मेट्रो प्रशासना विरोधात घोषणबाजी केली. मेट्रो अधिकार्‍यांना यावेळी बांगड्या भेट दिल्या. आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच 1) व वनाज ते रामवाडी (रिच 2) या मेट्रो मार्गाचे काम सध्या प्रगती पथावर आहे. मात्र मेट्रो स्थानके व मार्गामुळे सुमारे 688 कुटुंबे बाधित होत आहेत. त्यामध्ये 242 व्यावसायिक व इतर सर्व निवासी मिळकती आहेत.

80 टक्के मिळकती या पुणे हद्दीतील आहेत. स्वारगेट मार्गावरील सर्वाधिक 472 घरे बाधित आहेत. त्यामध्ये 250 कुटुंबे कर्वे रस्त्यावरील बाल तरुण मंडळ, राजीव गांधी नगर, कामगार पुतळा, तोफखाना येथील आहेत. कसबा पेठेत एकूण 248 मिळकती असून त्यात 38 दुकाने तर मंडई येथे 90 मिळकती बाधित होत असून त्यात 38 दुकाने आहेत.