मेधा पाटकर यांच्या अटकेचा निषेध

0

पिंपरी-चिंचवड । मध्यप्रदेश येथे नर्मदा खोर्‍यातील सरदार सरोवर धरणामुळे विस्थापित होणार्‍या लाखो कुटुंबांच्या योग्य पुनर्वसनासाठी मेधा पाटकर आणि अकरा सहकार्‍यांनी तेरा दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. परंतु सोमवारी मध्यप्रदेश पोलिसांनी उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेचा महाराष्ट्र स्वराज अभियान संघटनेने निषेध केला आहे.

मध्यप्रदेश सरकारचे अमानवी कृत्य
याबाबत अभियानाचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे, की मध्यप्रदेश सरकारने पोलिसांचा वापर करून जबरदस्तीने उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले व हे आंदोलन चिरडून टाकण्याचा असंवैधानिक प्रयत्न केला. सरकारचे हे कृत्य अमानवीय तर आहेच परंतु त्याचबरोबर लोकशाहीचा गळा घोटणारेही आहे. लोकशाही मार्गाने व महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने मागील 32 वर्षांपासून मेधा पाटकर यांनी नर्मदेच्या खोर्‍यातील सरदार सरोवर धरणामुळे विस्थापित होणार्‍या लाखो कुटुंबांच्या योग्य पुनर्वसनासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. या कुटुंबांचे पूर्ण व योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत या मागणीसाठी त्यांनी मागील तेरा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्याचबरोबर यापूर्वी विस्थापित झालेल्या आदिवासी व ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. आंदोलनास आमचा सक्रीय पाठींबा असून त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यभर यासाठी आंदोलन करण्यात येईल.