‘मेनोपॉज’ 25 रोजी रंगभूमीवर

0

पुणे । मासिक पाळी, रजोनिवृत्ती, लैंगिक संबंध अशा विषयावर स्त्रिया कधीही व्यक्त होत नाहीत. त्यांच्यातील ही घुसमट कमी करून तिला होणारा त्रास दूर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच प्रयत्नातून मेनोपॉज हे नाटक स्त्रियांचा अबोल संवाद रंगभूमीवर घडविणार आहे. मेनोपॉज या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या 25 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणार्‍या आणि जनजागृती करणार्‍या या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रा. नितीनकुमार यांनी केले आहे.

नाटकाविषयी बोलताना प्रा. नितीनकुमार म्हणाले, स्त्रिया सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचा विचार करतात. त्यासाठी 24 तास ऑन ड्युटी काम करतात. कसलीही अपेक्षा न ठेवता कुटुंबावर लक्ष ठेवण्याचा तिचा प्रयत्न असतो. अनेकदा ती स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांची काळजी घेत असते. पण हे सर्व करत असताना कुठेतरी तिच्या इच्छा अपेक्षांचा सहज बळी दिला जातो.

आरोग्याच्या समस्यांकडेही तिचे अनेकदा दुर्लक्ष होत असते. कामाच्या व्यापात आणि चारचौघात बोलण्यात वाटणारी लाज यामुळे अनेक व्यक्तिगत गोष्टी अबोल व अव्यक्त राहतात. या नाटकाच्या माध्यमातून स्त्रियांच्या या समस्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकामध्ये उज्ज्वला गौड, राजेश्‍वरी राठी, जयश्री मंगेश, राधिका जाधव, सारिका कुलकर्णी, संपदा देवधर या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

जीवनाचा एक नवीन टप्पा
मेनोपॉज म्हणजे स्त्रीच स्त्रीत्व संपले अशी आजपर्यंत स्त्रियांची धारणा आहे. परंतु यानंतरही एक सुंदर जीवन जगता येत. मेनोपॉजनंतर जीवनाचा एक नवीन टप्पा असतो. आयुष्याच्या या वळणावर आपण पुन्हा नव्याने सुरुवात करता येते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्त्रियांचे असे अनेक प्रश्‍न आहेत ज्यांच्याबाबत कधीच खुलेपणाने चर्चा केली जात नाही. त्यांनी या विषयावर मोकळेपणाने चर्चा करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष्य द्यायला हवे. यासारख्या अनेक प्रश्‍नांची उकल या नाटकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे, असे नाटकातील लक्षवेधी भूमिका साकारणार्‍या उज्ज्वला गौड यांनी सांगितले.