हो चि मिन्ह सिटी (व्हिएतनाम) । मसी मेरी कोमने शनिवारी आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीतले स्थान निश्चित करत या स्पर्धेतील सहाव्या पदकावर दावेदारी सांगितली आहे. उपांत्य पूर्व फेरीत मेरीने चायनिज तैपईच्या मेंग चिए पिनला हरवून 48 किलो गटातील लाइट फ्लायवेट गटातील अंति चौघा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. 34 वर्षीय मेरीने आशियाई स्पर्धेत याआधी चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंखले आहे. उपांत्य फेरीत तिचा सामना जपानच्या सुबासा कोमुराशी होईल. पहिल्या फेरीत या दोघींनी सावध खेळ केला. सुरुवातीला त्यांनी एकदम आक्रमक खेळ केला नाही. दुसर्या फेरीत दोघींनीही खेळाचा वेग वाढवला. पण मेरीने वैविध्यपूर्ण खेळ करत पिनच्या आव्हानातील हवा काढून टाकली. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या मेरीने सांगितले की, स्पर्धेनुसार ती 48 आणि 51 किलो गटामध्ये बदल करत राहणार आहे.
पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरीने आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 51 किलो गटाचा समावेश झाल्यावर 2010 पासून या गटात खेळण्यास सुरुवात केली. ती सहाव्यांदा आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी झाली आहे. राज्यसभेची सदस्य असलेल्या मेरीने निवड चाचणी लढतींमध्ये सहाही सामने जिंकले होते. या दरम्यात तिने जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सरजूबालादेवीलाही हरवले होते. दरम्यान व्यावसायिक बॉक्सिंगकडून पुन्हा हौशी बॉक्सिंगकडे वळलेल्या सरिताने 60 किलो ऐवजी 64 किलो गटात आपली दावेदारी सांगितली आहे.