नवी दिल्ली : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी भारतीय संघाला अवघ्या दोन विकेट हव्या आहेत. आज दुपारी चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८५ षटकात ८ गडी गमावून २५८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे नाथन लिओन (६) आणि पेट कमिंस (६३) धावांवर नाबाद खेळत आहेत.
भारतीय संघाने ८ बाद १०६ धावांवर आपला डाव घोषित केला होता. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य प्राप्त झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांत आटोपला होता. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फारशी कामगिरी दाखवता आली नाही. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शामी यांनी केलेल्या वेगवान गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला. परंतु, नाथन लिओन आणि पेट कमिंस यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावाची सुरुवातही फार चांगली झाली नाही. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचे ४४ धावांवर २ गडी बाद झाले. मयांक अग्रवालने ख्वाजाचा झेल सोडला नसता तर ऑस्ट्रेलियाची आणखी दयनीय स्थिती झाली असती. जीवदान मिळालेल्या ख्वाजाने मार्कस हॅरीससोबत २७ धावांची भागीदारी केली. ख्वाजाने ३३ धावा तर शॉन मार्शने ४४ धावा केल्या. उद्या कसोटीचा पाचवा दिवस असून भारताला जिंकण्याची संधी मिळाली आहे.