तमिळमध्ये सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बोरव्हा (ता. तेल्हारा, जि. अकोला) नावाचे शंभर उंबर्यांचे आदिवासी गाव आहे. गावात प्रवेश केल्यावर स्वच्छ सारवलेली घरं मनाला प्रसन्न करतात, जगण्यासाठी अतिशय मर्यादित साधनं आणि मोजकीच जागा लागते. मात्र मनाच्या श्रीमंतीसाठी मन मोठं लागतं, हे या गावातील लोकांनी इथे गेल्यानंतर काही वेळातच दाखवून दिले.
आपल्या लोकांना माणूस म्हणून जगता यावे, ते मुख्य प्रवाहात यावेत यासाठी धडपडणारी तरुणी नासरी चव्हाण हिची मुलाखत घेण्यासाठी आम्ही या गावात आलो होतो. नासरीचे गाव फिरुन बघितले, नासरीच्या प्रयत्नातून शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या प्रकल्पांतर्गत हे गाव निवडले गेले आहे. कंपोष्ट खत, रसायन विरहित फवारणीचे औषध या गावात गेल्या तीन वर्षांपासून वापरले जात आहे. नासरीबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होती, त्यामुळे तिला बोलतं केलं. तिच्या गावात 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेली ती एकटीच मुलगी आहे. गावात आदिवासी विकासाच्या सरकारी योजनांच्या निमित्ताने अनेक वेळा अधिकारी येत-जात राहतात. पण या योजना मात्र कधीच पोहोचत नव्हत्या. यामुळे तिने प्रयत्न केल्याने मागील 4 वर्षापासून गावामध्ये शेळी पालनासाठी एकूण 23 कुटुंबांना प्रत्येकी 3 शेळ्या अशा 69 शेळ्या अनुदानातून मिळाल्या. आता शेळ्यांची संख्या वाढली असून गावकर्यांना त्यापासून पैसा मिळत आहे. हे पाहूनच पुढे कृषि समृद्धी प्रकल्पामार्फत 40 कुटुंबांना कुक्कूट पालनासाठी 400 कोंबड्या गावात उपलब्ध झाल्या. ती पुढे म्हणाली की, गावात सर्वच अशिक्षित आदिवासी शेतकरी आहेत. त्यामुळे आम्हाला शेती बद्दलचे ज्ञान नव्हते, आम्ही पारंपरिक शेतीच करत होतो. तालुक्यापासून गाव दूर असल्यामुळे शेतीबाबतची काही माहितीसुद्धा उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे शेतीत कर्ज फेडण्या इतकेही उत्पन्न येत नव्हते. मात्र मागील 4 वर्षापासून शासकीय कृषि विकास प्रकल्पामार्फत सर्व विकास समितीच्या माध्यमातून मी गावात शेतकर्यांची शेती शाळेचे आयोजन करते आहे. त्यांच्यामार्फत बायोडायनॅमिक सेंद्रीय शेती पद्धतीची माहिती शेतकर्यांना दिली जात आहे. यातूनच शेतीसाठी लागणार्या वेगवेगळ्या निविष्ठा जसे बायोडायनॅमिक कंपोष्ट कल्चर (एस-9) आम्ही घरीच तयार करायला शिकलो आहोत. आदिवासी समाजात शाळेस न जाणार्या अशा मुलामुलींना एकत्र करुन मी माझ्या घरीच दररोज सायंकाळी शाळा घेते व त्यांना माझ्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. माझ्या शाळेत 20 मुले व 15 मुली दररोज येतात. यापैकी काही मुले येणार्या शैक्षणिक वर्षात पुढच्या वर्गात प्रवेश घेतात. त्यांच्या पालकांनाही आपली मुले शिकावी याचे महत्त्व पटत आहे. यावर्षी मी नागपूर येथे जाऊन 10 दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे. नासरीच्या कामाचा झपाटा मोठा आहे. तिची अंगभूत ताकद खूप मोठी आहे. तिच्या क्षमतेचा विचार करता तिचे क्षितीज अजून विस्तारावे यासाठी आम्ही तिला शुभेच्छा दिल्या.
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी सातारा