पाचोरा। भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी पाचोरा येथे गुरुवारी 25 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात आयोजीत केलेल्या मेळाव्यासाठी 5 हजार युवकांचा समावेश असल्याने पाच हजार बेरोजगांराना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पाचोरा-भडगाव रोडवरील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक कंपनीकडे नोंदणी केल्यानंतर टोकन घेण्यात येऊन उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी 11 वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्याभरातील युवकांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील होते.
7 हजार नोंदणी
मेळाव्यास उपस्थित तरुणांनी सुरुवातीस नोकरीसाठी नोंदणी केली. राज्यभरातील 35 कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. 35 कंपन्यांमधील 3 हजार 500 रिक्त असणार्या जागांवर तरुणांना संधी मिळणार आहे. आमदार किशोर पाटील यांच्या मतदार संघातील 700 महिला बचत गट यांचे प्रतिनिधी हजर होते.
यशस्वतीतेसाठी प्रयत्न
रोजगार मेळाव्याचे सुत्रसंचालन गणेश पाटील, आभार नाना वाघ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय जैस्वाल, किशोर बारावकर, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, जितू पेंढारकर, दीपक पाटील, विजू भोई, वैभव राजपूत, अनिकेत सूर्यवंशी तसेच पाचोरा, भडगाव तालुक्यातून आलेले शिवसैनिक, स्वयंसेवक होते. मेळाव्यास उपस्थित असलेल्यांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी आमदार आर.ओ. पाटील, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील,दीपक राजपूत, उध्दव मराठे, भडगाव पंचायत समितीचे सभापती विकास पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, सुरेशदादा जैन, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, चिमणराव पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा महानंदा पाटील यांना विशेष आमंत्रीत करण्यात आले होते मात्र ते उपस्थित राहू शकले नाही.