मेहतानंतर देसाई यांनी राजीनामा देण्याची मागणी

0

मुंबई । गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने विधान परिषदेत विशेष सत्रात गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. विशेष सत्रात या विषयी चर्चा न घेता नियमित बैठकीत चर्चा घेऊ, असे उपसभापती मानिकराव ठाकरे यानी सुचवूनही विरोधक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

तीन वेळा कामकाज तहकूब
नियम 260 अन्वये राज्यातील महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटीसंदर्भात चर्चा होती. या चर्चेला गृहनिर्माणमंत्री महेता उत्तर देणार होते. परंतु त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आधी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. जोपर्यंत महेता राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा इशारा मुंडे यांनी दिला. यावेळी काँगेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा 15 मिनिटांसाठी, नंतर 20 मिनिटांसाठी तर त्यानंतर एक तासासाठी
तहकूब झाले.

नियमित बैठकीतही गोंधळ
नाशिक इथली एमआयडीसीने संपादित केलेली 400 एकर जमिन पुन्हा मालकाला बेकायदेशीररित्या परत केल्याप्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधकांनी विधानपरिषदेच्या नियमित बैठकीतही अभूतपूर्व गोधळ केला. यामुळे नियमित कामकाज पाच वेळा तहकूब होऊन नंतर तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास पार पडला तसेच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयकासह एकूण चार विधेयकं मंजूर करण्यात आली. लोकलेखा समितीचा तेवीसावा अहवाल आणि अन्य कागदपत्र या गोंधळातच सभागृहासमोर मांडण्यात आली.

विरोधकांचा हौदात ठिय्या
विधानपरिषदेचे आज नियमित कामकाज सुरू होताच प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याची मागणी करत धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा प्रस्ताव प्रश्नोत्तराच्या तासानंतर घेतला जाईल असे सांगितले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत अपवादात्मक स्थितीत स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी आहे असं स्पष्ट केलं मात्र सभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारत हा प्रस्ताव मांडू दिला नाही त्यामुळे विरोधकांनी गदारोळ करत हौद्यात येऊन घोषणाबाजी केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी आणखी एक स्थगन प्रस्ताव मांडत शिवसेनेच्या मंत्र्याना लक्ष केले.

इगतपुरीजवळची जमीन 4000 कोटींची
एमआयडीसाठी अधिसूचित केलेली इगतपुरीजवळची गोंदे दुमालमधील तीन ते चार हजार कोटी रुपयांची 400 एकर जमीन देसाई यांनी शिवसेनेच्या जवळ असलेल्या विकासाला दिली असा आरोप मुंडे यांनी केला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा ही मागणी विरोधकांनी लावून धरली जोपर्यंत प्रकाश मेहता – सुभाष देसाई यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत परिषदचे कामकाज चालू देणार नाही,असा पवित्रा विरोधकांनी घेतला.