पुणे । स्पर्धा परीक्षा काही जगावेगळे क्षेत्र नाही. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सुद्धा मेहनत किंवा अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी गरज असेल तर आपल्या सवयींमध्ये बदल करा, असे मौलिक मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शामकांत मस्के यांनी केले. ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम शिक्षक भवन येथे नुकताच पार पडला. यावेळी वित्त व लेखाधिकारी विशाल मेदुरकर-पाटील, तुषार निकम, डॉ. श्री. अजिंक्य पाटणी, गजानन ठोकळ, सुमित कोरणे आदी उपस्थित होते.
मेहनती सोबतच जिज्ञासा कायम ठेवून अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला. ज्याचा पाया मजबूत असतो तो इतरांपेक्षा तुलनेने लवकर प्रशासकीय सेवेत निवडला जातो. त्यासाठी मेहनतीसोबतच काही सॉफ्ट स्कील शिकून घेणे काळाची गरज असल्याचे मस्के यांनी सांगितले.
विशाल पाटील, तुषार निकम, डॉ. अजिंक्य पाटणी, गजानन ठोकळ, सुमित कोरणे यांनी विषयांनुसार नियोजन व महत्त्वाच्या ट्रिक्स समजावून दिल्या. ज्ञानज्योती संस्थेमार्फत कमवा आणि शिका योजना, रमेश घोलप स्वयं सहाय्यता गट योजना अशा योजना राबविल्या जातात. त्यांचा फायदा घेण्याचे आवाहन अर्चना पाटील यांनी केले. ज्ञानज्योतीस सारासार या मासिकाचे मोफत वाटप करण्यात आले.