एमआयडीसी पोलिसांनी वैद्यकीय अधिकार्याच्या मदतीने केली अटक ; दवाखाना सील करत साहित्य जप्त करण्याची कारवाई ; रुग्णाने केली होती पोलिसांकडे तक्रार
जळगाव : तालुक्यातील कुर्हाडदे येथील रुग्णांला मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेनंतर त्रास कमी होण्याएैवजी त्यात वाढ झाली. याबाबत रुग्णाने एमआयडीसी पोलिसांकडे डाॅक्टरांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी शासनाच्या विनापरवानगी उपचार करणार्या मेहरुणमधील जाकीर सत्तार खाटीक (रा.नागदुली, ता.एरंडोल) याचा पर्दाफाश केला आहे. गुरुवारी डॉ. खाटीक यास वैद्यकीय अधिकार्याच्या मदतीने मेहरुणमधीलच संतोष माता चौकातून अटक करण्यात आली असून त्याच्या दवाखान्याला सील ठोकण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाकीर खाटीक हा मुळ नागदुली, ता.एरंडोल येथील रहिवाशी असून म्हसावद येथे त्याने दवाखाना थाटला होता. काही महिन्यांपूर्वी म्हसावद येथे जितेंद्र रामा धनगर यांच्या खाटीक याने मूळव्याधीची शस्त्रक्रिया केली होती. यानंतर खाटीक यास म्हसावद येथे अडचणी निर्माण झाल्याने काही महिन्यापूर्वी त्याने मेहरुणमध्ये दवाखाना थाटला. दरम्यान, त्याने केलेल्या उपचारामुळे जितेंद्र धनगर या रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक खालावल्याने खाटीक याचा भांडाफोड झाला. शस्त्रक्रिया करुनही त्रास कमी होण्याऐवजी जास्तीचा त्रास झाला. याबाबत धनगर यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली होती.
गटविकास अधिकार्यांना केला पत्रव्यवहार
पोलिसांनी बोगस वैद्यकिय व्यवसाय प्रतिबंधात्मक समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकार्यायांकडे खाटीक यांची पदवी तपासण्याबाबत सूचीत करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय दगडू चव्हाण यांनी 26 सप्टेबर 2018 च्या पोलिसांच्या पत्रानुसार जाकीर खाटीक याचे औषधोपचार संदर्भातील प्रमाणपत्र, पदवी याचे अवलोकन केले असता मूळव्याधीबाबत औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यास शासन मान्य नसल्याचे स्पष्ट झाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक योगेश शिंदे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.संजय चव्हाण,आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर पाटील, विस्तार अधिकारी सी.आर.मोतीराया, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, माधुरी बोरसे, महेंद्रसिंग पाटील, संदीप पाटील, किशोर पाटील व मिलिंद पाटील यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी मेहरुणमधील संतोषी माता चौकातील खाटीक याच्या दवाखान्यात छापा मारला. तेथे शस्त्रक्रिया करण्याचे सर्व साहित्य व काही औषधी आढळून आल्या. दवाखाना सील करुन खाटीक याला अटक करण्यात आली. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन खाटीकविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.