मेहरुण तलावावर खून झालेला मयत सुप्रीम कंपनीतील कर्मचारी : अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा

जळगाव : जळगावात अवघ्या पंधरा दिवसात तीन खुनांची घटना ताजी असतानाच पुन्हा 45 वर्षीय प्रौढाचा खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता मेहरुण तलावाच्या काठावर उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दिनेश भिकन पाटील (45, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव असून ते सुप्रीम कंपनीत कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दगडाने ठेचून केली हत्या
मेहरुण तलावाच्या काठावर एका प्रौढाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्‍यांनी धाव घेली. सुरुवातीला मयत 45 वर्षीय अनोळखी होता मात्र काही तासातच पोलिसांना ओळख पटवण्यात यश आले आहे. मृत दिनेश भिकन पाटील (45, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे. त्यांची हत्या नेमकी कुणी वा कोणत्या कारणावरून केली? याचा रात्री उशिरापर्यंत उलगडा करण्यात पोलिस यंत्रणा व्यस्त होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी ? असा अंदाज आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जळगाव शहरात लागोपाठ झालेला हा चौथा खून असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत दिनेश पाटील यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व विवाहित मुलगी, भाऊ असा परीवार आहे. रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावात खुनांचे सत्र कायम
समता नगर भागातील रहिवासी सागर नरेंद्र पवार (28) या तरुणाचा विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून संशयीत आरोपी अमित नारायण खरे (डॉ.आंबेडकर नगर, समता नगर, जळगाव) याने शुक्रवार, 25 मार्च रोजी रात्री खून केला होता तर जळगावच्या शिवाजी नगर भागातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेशी असलेल्या दोघांच्या असलेल्या अनैतिक संबंधातून रीक्षा चालक असलेल्या नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाची चॉपरचे वार करून हत्या करण्यात आली होती. जळगावातील शिवाजी नगर, हुडको भागात शनिवार, 26 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. या दोन्ही खुनांच्या घटना ताज्या असतानाच सोमवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा शहरातील शिवाजीनगर हुडको परीसरात 40 वर्षीय मोहंमद मुसेफ शेख इसाक (40, रा.शिवाजी नगर) यांचा शेख अलिमोद्दीन शेख (28, रा.उस्मानिया पार्क) याने जुन्या वादातून खून केला होता. पंधरा दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्यानंतर शनिवारी दुपारी पुन्हा मेहरुण तलावाकाठी झालेल्या खुनानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.