मेहरूण तलावावरून तरुणांच्या बॅगांसह मोबाईल व रोकड लांबविली

भुसावळ/जळगाव : मेहरुण तलावासमोर रनिंग करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या बॅगा अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. त्यात मोबाईलसह रोकड मिळून 28 हजारांचा मुद्देमाल होता. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाळत ठेवून केली चोरी
विकी नागेश मुंडोकार (25, रा.महादेव मंदिराजवळ, मेहरूण) हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने तो दररोज मेहरूण तलाव येथे मित्रांसोबत रनिंग करण्यासाठी येतो. दैनंदिनीप्रमाणे 17 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास विकी मुंडोकार हा त्याचा मित्र राधेश्याम नारायण चांदेकर (समतानगर), राकेश अरुण पाटील (रायसोनी नगर) आणि अंकित बाळकृष्ण कापुरे (श्याम नगर, शिव कॉलनी) हे रनिंग करण्यासाठी मेहरुण तलावावर आले व कृष्णलॉनच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांनी दुचाक्या लावल्या आणि तेथेच बॅगा ठेवून रनिंग करण्यासाठी ट्रॅकवर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तेथे ठेवलेल्या चौघांच्या बॅगा चोरून नेल्या. बॅगेत विकी मुंडोकारचा 14 हजारांचा मोबाईल आणि राधेश्याम चांदेकर याची 14 हजारांची रोकड असा एकूण 28 हजारांचा मुद्देमाल होता. तपास अल्ताफ पठाण करीत आहे.