मेहुणीवर बलात्कार केल्याच्या संशय : मारहाणीत न्हावीतील सालदाराचा मृत्यू

0

परप्रांतीय मेहुण्यासह दोघांना फैजपूर पोलिसांकडून अटक

फैजपूर- आपल्या मेहुणीवर अत्याचार केल्याच्या संशयातून दोघांनी न्हावीतील सालदारास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवला. 18 सप्टेंबर रोजी ही घटना घडली तर या प्रकरणी फैजपूर पोलिसात शुक्रवारी दोघा आरोपींविरुद्ध खुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरसिंग रशा भील (50, रा.न्हावी) असे खून झालेल्या सालदाराचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी भुर्‍या कणसिंग भील (पिंप्राणा, जि.खंडवा) व करण अमरसिंग भील (नागोणी, जि.बर्‍हाणपूर) या दोघांना अटक केली आहे.

पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचाराचा संशय
मयत सुरसिंग भील याने आरोपी भुर्‍या कनसिंग भिल याच्या मेहुणीवर अत्याचार केल्याचा संशय होता शिवाय पाण्यातून गुंगीचे औषध दिल्याचेही या तरुणीने सांगितल्याने आरोपी भुर्‍या भील व करण भील यांनी 18 रोजी न्हावी शिवारातील धनेश्वर भोळे यांच्या शेतातील विहिरीजवळ सुरसिंग याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो मयत झाला. या घटनेप्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र चौकशीअंती सुरसिंग याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची बाब समोर आल्याने आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी न्हावी शिवारातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. मयताचा मुलगा मुन्ना भील (30) याच्या तक्रारीवरून दोघा आरोपींविरुद्ध शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी फैजपूर डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी भेट दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.