मेहूण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील मेहूण येथील सुरु असलेला प्रजिमा 16 हा सार्वजनिक रस्ता दुरसंचार विभागातर्फे केबल टाकण्याच्या नावाखाली दुतर्फा खोदून नादुरुस्त केला आहे. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत असल्याने रस्ता त्वरीत दुरुस्त करावे, असे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले आहे. तालुक्यातील मेहूण गाव ते मेहूण फाटा दरम्यान प्रजिमा 16 हा सार्वजनिक डांबरी रस्ता होता. त्यावरुन सुरळीतपणे वाहने ये-जा करीत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून दुरसंचार विभागातर्फे ओएफसी केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला जेसीबीद्वारा खोदकाम करण्यात आले आहे.

ग्रामस्थांना चिखलातून तुडवावी लागते वाट
यामुळे मात्र सदर रस्त्यावरची वाहतूक दोन-तीन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झालेली आहे. रस्त्यावर चिखलच चिखल व खड्डे झालेले आहे. यामुळे नागरीक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता पूर्ववत मोकळा व खड्डेविरहित करुन मिळावा, अशी मागणी मेहूण ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, मेहूण गावचे नागरीक तसेच पीआरपीचे तालुकाध्यक्ष संजू इंगळे, अतुल बोदडे, रविंद्र तेली, लकी कापडणे, तुषार इंगळे, सिध्दार्थ इंगळे, अजय इंगळे यांच्यासह असंख्य नागरिकांनी केली आहे. सदरचे निवेदन तहसिलदार रचना पवार यांना देण्यात आले.