भुसावळ । शहरासह परिसरातील काही सुशिक्षीत बेरोजगारांनी मैत्रेय संस्थेत काम करुन आपल्या परिसरातील नागरिकांच्या पॉलीसी काढल्या मात्र या पॉलिसीची मुदत संपूनही त्याची रक्कम परत मिळत नसल्यामुळे ऐजंटांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात ठोस उपाययोजना करुन रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न करावे या मागणीसाठी उपविभागीय अधिकार्यांना सोमवार 29 रोजी निवेदन देण्यात आले.
शहरातील कार्यालयास लागले टाळे
शहरातील सुशिक्षीत बेरोजगारांनी मैत्रेय कंपनीचे ऐजंट होऊन मित्र परिवार व हितचिंतकांच्या पॉलिसी काढल्या. मात्र मैत्रेयचे कार्यालय 1 वर्षापासून बंद असून मैत्रेयेचे सर्व प्रतिनिधी व ग्राहक हवालदिल झाले आहे. त्यांची मैत्रेयची मॅच्युरिटी झाली असून आजपर्यंत त्यांचा पैसा मिळालेला नाही. त्यामुळे ग्राहक मैत्रेय प्रतिनिधींना त्रास देत आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपासून भुसावळ शाखेत रक्कम भरण्यात येत होती. त्यानंतर 2009 मध्ये मैत्रेय सर्व्हिसेस बंद करुन मैत्रेय प्लॉटर्स अॅड स्ट्रक्चर नावाने कंपनीची सुरुवात करुन रक्कम घेण्यात आली.
यांचा होता सहभाग
ठेवीदारांच्या ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त झाला आहे. परंतु पैसे मिळण्यास विलंब होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत. रावेर, सावदा, फैजपूर, निंभोरा, मुक्ताईनगर, मलकापूर या विभागातील गुंतवणूकदारांनी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले. या निवेदनावर प्रदीप लोंढे, राजेंद्र गणवीर, मिनाक्षी जावळे, सुनिल तायडे, मनोज कुवरलाल, दीपक सुरवाडे, मिराबाई भास्कर, मिना सपकाळे, दीपाली महाजन, वैशाली पाटील, सुनिता जंगले, शारदा भंगाळे, सुनिल चौधरी यांच्या स्वाक्षर्या आहेत.