मैत्र जीवाचे …

0

आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार … सर्वत्र फ्रेंडशीप डे ची धूम… मैत्रीचं नातं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं, आधार देणारं… मैत्रीत अनेकदा नातं रक्ताचं नसलं तरी बंध घट्ट असतात… खूपदा रक्ताच्या नात्यातही मैत्रीचे अनोखे ऋणानुबंध जुळतात … नात्याला मैत्रीचं हळूवार कोंदण लाभलं की जगणं अधिक समृद्ध होतं. मैत्रीदिनानिमित्त शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी उलगडलेल्या बहिणीपेक्षा मैत्रीणच अधिक असलेल्या झेलम जोशी यांच्याशी जुळलेल्या भावबंधाचा हा स्मृतीपट …

STORM IS COMING, LET US TOGETHER…..
ही वडिलांची शिकवण आठवणीत ठेवून यशाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या नीलम आणि झेलम अशा आम्ही दोन बहिणी. आम्ही दोघी एकमेकांच्या अगदी विरोधाभास वाटू. मात्र, विचारांचा प्रवाह एकच… एक झेलम कॉर्पोरेट विश्वात करिअर लीड करणारी तर दुसरी मी राजकीय वातावरणात सेनेची निष्ठा जपणारी. झेलम माझी बहिण कमीच, मैत्रीण खास आहे. आम्हा दोघींच्या वयातले अंतरही अवघे अडीच वर्षांचे. त्यामुळे तिच्या बहिणीच्या दराऱ्यापेक्षा मैत्रिणीचा आधारच जास्त सुखावला आणि जाणवला.

आवडीच्या साड्या नेसून वचपा
आई-बाबा केंद्रीत पुण्यातील आयुष्य जगताना एकत्र कुटुंबपद्धती आम्हा दोघी बहिणीनी जपली. याच संस्कारांच्या जोरावर आज आमची पुढची पिढीही एकत्र कुटुंब पद्धती पुढे नेत आहे. कॉलेजच्या दिवसांत सर्वच घरातील बहिणींमध्ये कपड्यांवरून होणारे वाद आम्हा दोन मैत्रिणीतही झाले. मात्र, आता त्याचा वचपा झेलमच्या सुंदर आणि आवडणाऱ्या साड्या नेसून काढते. मात्र, मैत्रीण असणाऱ्या झेलम या माझ्या बहिणीने कधीच तक्रार केली नाही. राजकारण, समाजकारण, वैयक्तिक आयुष्य साऱ्याच ठिकाणी झेलमची साथ, आधार मला मिळाला. तिच्यावर विश्वास आहेच; पण आदराची भावनाही मी जपते.

घरीच थाटलं ऑफिस
आमचे बाबा आजारी असताना पुण्यातील शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हे पद मी सांभाळत होते. त्यावेळी कधी-कधी सकाळी 9 ते रात्री 1 वाजेपर्यंत उसंत मिळत नव्हती. वडील माझी सारखी आठवण काढत होते. मात्र, त्यांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. अशावेळी मी, बहिण झेलम आणि मुलगी आम्ही घरीच कार्यालय उघडले. आम्ही साऱ्या जणी घरूनच पसारा सांभाळू लागलो. तेव्हाही झेलमचीच एक मार्गदर्शक, मैत्रीण म्हणून सर्वाधिक मदत झाली.