भुसावळ : जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळाला महत्वाचे स्थान आहे. सद्य स्थितीत जगातील प्रत्येक विकसीत देश हा शालेय स्तरापासून खेळाला महत्व देतो. यामुळे आरोग्यासह बौध्दीक विकासालाही चालना मिळत असते. खेळाला वयाची अट नसते कर्मचार्यांना देखील खेळासाठी प्रोत्साहन दिल्यास त्यांचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होऊन कर्मचार्यांमध्ये उत्साह द्विगुणीत होऊन कामकाजात सुधारणा होऊन पर्यायाने संस्थेचा देखील विकास साधला जातो. त्यामुळे जीवनात खेळाला महत्व देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मध्य रेल्वेचे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी केले. महानिर्मितीच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक समारंभ रविवार 1 रोजी दुपारी 4 वाजता दिपनगरच्या दीपशक्ती क्रीडा संकुलात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे कार्यकारी संचालक राजू बुरडे, सतीश चवरे तर विशेष अतिथी म्हणून मध्य रेल्वे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांला व खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली.
खेळाडूंनी घेतला क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आनंद
यात महानिर्मितीच्या राज्यभरातील वीज केंद्रांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कब्बडी, मैदानी स्पर्धा, बास्केटबॉल आदी स्पर्धा पार पडल्या यातील विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांचे मार्गदर्शनाखाली विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. भुसावळ वीज केंद्राच्या आयोजन समितीने घेतलेल्या परिश्रमामुळे, सुंदर मैदानात खेळण्याचा विशेष आनंद, रंगारंग उद्घाटन समारंभ, नागरिकांची लक्षणीय उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दीपनगर वसाहतीतील मुलभूत सोयी सुविधांमुळे खेळाडूंना क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आनंद घेता आला.