मै झूकुंगा नही, चालीसगाव के विकास के लिये मै रुकुंगा नही ; माजी आमदार राजीव देशमुख

चाळीसगाव शहरात शरद संवाद यात्रेत पुष्पा स्टाईलने घेतला समाचार

चाळीसगाव : माझी मणक्याची शस्रक्रिया झाल्यामुळे काही लोकांना वाटतंय मी थांबलोय, पण चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी मी थांबणार नाही, अशी भावना चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी शरद संवाद कार्यक्रमात व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर शरद संवाद कार्यक्रम सुरु आहे. याच निमित्ताने मंगळवारी चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद संवाद कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात माजी आमदार राजीव देशमुख यांनी विरोधकांचा पुष्पा स्टाईलने समाचार घेतला, त्यांनी एक प्रकारे विरोधकांना इशाराच देऊन टाकला.

राजीवदादा म्हणाले ; मै झूकुंगा नही,
राजीव देशमुख म्हणाले की, मै झूकुंगा नही, चालीसगाव के विकास के लिये मै रुकुंगा नही.. आपल्या मिश्किल शैलीत राजीव देशमुख यांनी पुष्पा सिनेमाचा डायलॉग मारल्याने कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले. आगामी काळात मीच विधानसभेचा उमेदवार असणार हे राजीव देशमुख यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. भाजपा सत्तेचा दुरुपयोग कश्या प्रकारे करत आहे, हेही मेहबूब शेख यांनी सांगितले. शरद संवाद कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रवक्ता योगेश देसले, माजी आमदार राजीव देशमुख, ललित बागुल, प्रमोद पाटील, किसनराव जोर्वेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.