मॉडेल आयटीआय मध्ये गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक

0

संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई : लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात मॉडेल आयटीआय सुरु करण्यात आले आहे. यामधून गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केली.

कौशल्य विकास मंत्री निलंगेकर यांनी कौशल्य विकास विभागाची आज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेतली. यावेळी कौशल्य आयुक्त ई. रवींद्रन यांच्याबरोबर कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री यावेळी म्हणाले, मॉडेल आयटीआय तयार करण्यासाठी राज्य शासनाने 15 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र असे जरी असले तरी या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती, वेगवेगळया संकल्पनावर आधारित कौशल्ययुक्त ज्ञान मिळणे आवश्यक आहे. असे करीत असताना या आयटीआयचा दर्जा, गुणवत्ता आणि नाविन्यता टिकवून शिक्षण मिळणे आवश्यक असून यासाठी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.कौशल्य विकास विभागामार्फत एकात्मिक विपणन संवाद प्रणाली राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध कंपन्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक असून यासाठी ही प्रणाली श्रेणीबध्द होणे आवश्यक असल्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

निलंगेकर यावेळी म्हणाले, एकात्मिक विपणन संवाद प्रणाली अंतर्गत राज्य शासनाच्या 96 आयटीआय सुरु करुन येथे 6 वेगवेगळे अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा होत असून या सुधारणांची अंमलबजावणी क्रीडा, पर्यटन,सायबर, वैद्यकीय, वने आणि अन्नप्रक्रिया या क्षेत्रात होणार आहे.

5 टक्क्यांपर्यंत अप्रेंटिस ठेवणाऱ्यांना रात्र पाळीतही अप्रेंटिस ठेवण्याची मुभा
एकूण कंपनीत असलेल्या मनुष्यबळापैकी 5 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांपर्यंत अप्रेंटिस ठेवणाऱ्या कंपन्यांना रात्रपाळीतही अप्रेंटिस ठेवण्याची मुभा असून त्या कंपनीने सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.