‘मॉडेल युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स’चे आयोजन

0

जळगाव । अनुभूति इंटरनॅशनल स्कूल व इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 29 जानेवारी दरम्यान अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे मॉडेल युनायटेड नेशन्स कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात विविध राष्ट्रे कशा प्रकारे आपापले विषय जगासमोर मांडतात हे विद्यार्थ्यांना आदर्शरुपात दाखवून त्यांना त्यात सहभागी होण्याची संधी देणारी ही परिषद असून जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा मोठ्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जिल्हाभरातील 250 विद्यार्थी सहभागी होणार असून संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेतील कामकाजाचा अनुभव त्यांना घेता येणार आहे.

भारतासह अन्य 15 देशांमध्ये होणार परीषदा
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये अशा प्रकारच्या जागतिक ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी आदर्श परिषद घेण्याचा मान प्रथमच इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्सला मिळाला आहे. भारतासह अन्य 15 देशांमध्ये अशा 108 परिषदा होणार असून यावर्षी जगभरातील 1400 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या परिषदेसंदर्भात अधिक माहिती देताना अनुभूति स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी सांगितले की, इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स ही संस्था विद्यार्थ्यांच्या जागतिक ज्ञानाचे क्षितिज विस्तारून भारतातील व इतर राष्ट्रातील युवकांना भारतीय संस्कृतीच्या अंतरात्म्यातील प्रतिभा, प्रेरणा व ऊर्जेचे दर्शन घडवण्याचा अभिमानास्पद प्रयत्न करीत आहे. भारताला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान मिळावे यासाठीही ही संस्था प्रयत्न करीत असून यासाठी या संस्थेचे 26 हजार विद्यार्थ्यांचे दल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

पाश्चिमात्य जगाने भारताकडे पाहून शिकावे
यावेळी अनुभूति स्कूलचे प्राचार्य जे.पी.राव म्हणाले की, या परिषदेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या विकासासाठी व ज्ञानक्षितिज विस्तारासाठी विविध तर्‍हेच्या अनुभूतिंचा मागोवा घेण्याचा, विद्यार्थ्यांना बहुमोल संधी मिळवून देणारा एक मंच निर्माण करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यातूनच उज्ज्वल भविष्य निर्माण करणारे सुजान नागरीक व पुरोगामी विचारवंत जोपासले जावेत हे आमचे उद्दिष्ट आहे. इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्सचे अध्यक्ष ऋषभ शहा यांनी सांगितले की, पाश्चिमात्य जगाने भारताकडे पाहून काही शिकावे अशी वेळ आता आली आहे. भारताने जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आली असून युवापिढीने यासाठी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.