पुणे : महाराष्ट्रात मॉन्सूनचे 8 जून रोजी आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
दक्षिण अरबी समुद्रातून पुढे सरकण्यासाठी मॉन्सूनला अनुकूल वातावरण तयार होत असून लक्षद्वीप, केरळ, मध्य अरबी समुद्र, कर्नाटकची किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक आणि रायलसीमा येथे मॉन्सूनचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र व अरबी समुद्राच्या पूर्व भागात समुद्रसपाटीपासून दीड आणि साडेचार किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे तसेच बंगाल उपसागराच्या आग्नेय परिसरात चक्राकार वारे वाहत असून मॉन्सून पुढे सरकण्यासाठी ही स्थिती पोषक आहे.
मंगळवारी पावसाची शक्यता
मंगळवारी पुणे आणि परिसरात काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी शहर आणि परिसरात दिवसभर उकाडा जाणवत होता. दिवसभरात काही काळ आकाशात ढग आले तरी पाउस झाला नाही.