हजारो समाजबांधवांचा सहभाग ; प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकर्यांचा ठिय्या
भुसावळ- शहरातील नवजवानाने मुस्लिम संघटनेतर्फे शुक्रवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. खडका रोडवरील रजा चौकातून निघालेल्या या मोर्चात तब्बल पाच हजार मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून मोर्चेकर्यांनी मुस्लिम, दलित, सिख आणि इसाई या अल्पसंख्यांक समाजाचासाठी सक्षम संरक्षण कायदा तयार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करीत देशात होत असलेल्या मॉब लिंचींगच्या घटनांचा निषेध केला.
मूक मोर्चाने वेधले लक्ष
देशात मॉब लिंचींगच्या घटनांमुळे मुस्लीम समाजबांधवांचा बळी जात असून या घटनांच्या निषेधासह मारेकर्यांना शिक्षा व्हाव, आदींसह अन्य मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शुक्रवारी दुपारी तीन वाजता शहरातील खडकारोडवरील रजा चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. खडकारोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, बसस्थानक, बाजारपेठ पोलिस ठाणे, लोखंडी बोगदा, तापीरोड आदी मार्गाने मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकर्यांच्या हातात विविध मागण्यांसाठीचे फलक लक्ष वेधून घेत होते. मोर्चेकर्यांमधील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांच्यासोबत चर्चा केली. एमआयएमचे फिरोज शेख यांनी समाजबांधवांच्या मागण्यांवर शासनाकडून कारवाई व्हावी तसेच अल्पसंख्यांक समाजासाठी संरक्षण कायदा लागू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखला होता.