जळगाव । घरातील सदस्य वॉर्निंग वॉकला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरात डल्ला मारल्याची घटना शनिवारी सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना शहरातील न्यु पार्वती नगरात घडली असून चोरट्यांनी 47 हजार रूपयांची रोकड चोरून नेली आहे. दरम्यान, याप्रकरणी घरमालकाने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी देखील घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र, चोरट्यांबाबतचा काहीही सुगावा त्यांना मिळून आला नाही.
कुलूप तोडून घरात प्रवेश
शहरातील न्यु पार्वती नगरातील विश्वनाथ सावकार हे एकटे घरात राहतात. तर ते बांधकाम विभागातील कर्मचारी आहेत. दरम्यान, शनिवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास सावकारे हे नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर निघून गेले. हीच संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कूलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर सामान अस्ताव्यस्त करत कपाटातील 47 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. यासोबत कपडे व चादरी देखील चोरून नेले. सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास सावकाळे मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्यांना घराचे कूलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी लागलीच घरात धाव घेतली असता घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तर कपाटातील रक्कम देखील गायब झाली होती.
पोलिसात दिली तक्रार
चोरट्यांनी एक-दोन कपडे व चादर देखील चोरून नेल्याचे दिसून आले. घरात ठेवलेले फळ देखील चोरट्यांनी फस्त केल्याचे सावकारे यांना पाहणी दरम्यान दिसून आले. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरिक्षक बापुसाहेब रोहम, प्रदिप चौधरी आदी कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र, चोरट्यांबाबतचा काहीही सुगावा त्यांना मिळून आला नाही. अखेर सायंकाळी विश्वनाथ सावकारे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीबाबत तक्रार दाखल केली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी देखील सावकारे यांच्या घरा शेजारी राहणारे विकास पाटील यांच्या घरी देखील चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता.