मॉर्निंग वॉक करतांना तहसिलदारांची कारवाई

0

जळगाव । गिरणा नदीतून अनधिकृतरित्या वाळू उपसा केला जात आहे. पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि डंम्परमधून वाळू वाहतुक केली जात असते. यावर जिल्हा प्रशासनाने अनेकदा कारवाई करून देखील अवैध वाळू वाहतुक थांबत नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी नागझिरी शिवारातून तसेच डिएसपी चौक परिसरातीतून वाळू घेवून जाणार्‍या दोन ट्रॅक्टर पकडण्याची कारवाई तहसिलदार निकम यांनी केली.

मेहरुण, डीएसपी चौक परिसरात अडविली वाहने
जळगाव तहसिलदार अमोल निकम हे आज सकाळी सायकलींग करण्यासाठी गेले होते. मॉर्निंग वॉक करत असताना मेहरुण शिवारात विनानंबरचे ट्रँक्टर 1 ब्रास वाळु घेवून नागझिरी शिवारातून मेहरुण येथे जात असतांना तहसिलदार निकम यांनी पकडून कारवाई केली. त्यानंतर चिंचाली तलाठी वनराज बुधा पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक व मालकाविरूद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. यानंतर तहसिलदार परत घराकडे जात असतांना सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास डिएसपी चौक परिसरातील चर्चजवळ टॅ्रक्टर (क्रं.एमएच.19.एएन.0352, ट्रॉली क्रं. एमएच.19.बीक्यु.0802) मधून वाळु वाहतुक करतांना दिसून आले. त्यांनी चालकास अडवून नाव विचारले असता त्याने सोपान भगवान ठाकरे (रा.वैजनाथ) सांगितले.

तहसिलदार यांनी परवानाबाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगून ट्रॅक्टर मालक मनोज पाटील यांच्या सांगण्यानुसार वाळु वाहतुक करीत असल्याची माहिती दिली. यानंतर निकम व खेतमाळस यांनी ट्रॅक्टरचालकावर कारवाई करत ट्रॅक्टर व 2 हजार रुपये किंमतीची 1 ब्रास वाळु रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिली.

त्यानंतर तलाठी खेतमाळस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनापरवाना वाळु वाहतुक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक सोपान ठाकरे व मालक मनोज पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी ट्रॅक्टरचालकास अटक केली आहे.