भुसावळ- तालुक्यातील मोंढाळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मध्ये अनुसूचित जमातीच्या महिला या जागेसाठी रविवारी मतदान होवून सोमवारी मतमोजणी झाली. यामध्ये तुळसाबाई मांगो पारधी या 28 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत इंगळे यांनी घोषीत केले. तालुक्यातील शिंदी, आचेगाव, मोंढाळा, पिंप्रीसेकम- निंभोरा बुद्रुक, गोजोरा आणि चोरवड-खेडी अशा गावातील ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यामध्ये शिंदी येथील नवलसिंग पंचमसिंग राजपूत, आचेगाव- सुरेश गिरधर झांबरे, पिंप्रीसेकम- निंभोरा बुद्रुक -उषा एकनाथ बोरोले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत झाली तर मोंढाळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधील अनुसूचित जमाती महिा या जागेसाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार रविवारी या गावात मतदान प्रक्रीया राबवण्यात आली यामध्ये 272 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी तहसील कार्यालयात अवघ्या दहा मिनीटात मतमोजणी झाली. यामध्ये तुळसाबाई मांगो पारधी (80) यांना 150 तर लताबाई भिकारी साळुंके यांना 122 मते मिळाली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत इंगळे यांनी तुळसाबाई पारधी यांना 28 मतानी विजयी झाल्याचे घोषीत केले तर चोरवड-खेडी आणि गोजोरा या गावातून एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नसल्याने या गावातील दोन जागा रीक्त राहील्या आहेत.