मोखाडा (दीपक गायकवाड)। तालुक्यातील 178 बचत गटांना माहे ऑक्टोबरपासून तब्बल 10 महिन्यांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आधीच निष्कांचन असलेले बचतगट हतबल झालेले असून, आहार देताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोखाडा तालुक्यातील बचत गटांना माहे ऑक्टोबरपर्यंत देयके अदा झालेली आहेत. मात्र, त्यापुढील दहा महिन्यांची देयके भागवण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने अदा करता आलेली नाहीत. माहे मार्चपर्यंत देयके भागवता येतील एवढ्या निधीची उपलब्धता झालेली असून देयके मोखाडा कोषागारात सादर करण्यांत आल्याची माहिती मोखाडा बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून मिळाली आहे.
जुन्या 106 केंद्रांसाठी 42 लाख रुपयांची आवश्यकता
नवीन 72 केंद्रांसाठी 25 लाख रुपयांची, तर जुन्या 106 केंद्रांसाठी 42 लाख रुपयांची आवश्यकता असून, अशा प्रकारे निधीची तरतूद झाली तर सर्व बचतगटांचे देयके अदा करने सुलभ होणार आहे. तथापि माहे मार्चअखेरपर्यंतच निधी मिळाला असल्याने सद्यःस्थितीत तेवढीच देयके सादर केलेली असून, निधीची तरतूद होईल तशी देयके अदा करण्याची तजवीज केली जाईल, असे बालविकास प्रकल्प कार्यालयाने स्पष्ट केले आहे.