पुणे: सध्या कोरोना विषाणूमुळे सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ऐन परीक्षेच्या काळात सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बालेवाडी येथील गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ‘शिक्षण घरातून’हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना घर बसल्या शिक्षण मिळणार असून शैक्षणिक नुकसान टळणार आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य डॉ.अभिजित औटी यांनी दिली. 16 मार्चपासून मोझे महाविद्यालयातील प्राध्यापकांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यातून हा उपक्रम पुढे आला आहे. सोशल मीडियाचा वापर करून 40 टक्के अभ्यासक्रम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. ऍपच्या माध्यमातून प्रश्न देखील सोडविण्याची तयारी होणार आहे. गूगल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यापीठाचे सर्व पेपर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक रामभाऊ मोझे यांनी कौतुक केले आहे.