चाळीसगाव : पाचोरा तालुक्यातील नेरी वडगाव येथुन कन्नड तालुक्यातील वाकी येथे घराकडे मोटारसायकलवरुन परतत असतांना दोघा चुलत भावांच्या मोटारसायकला दिनांक 18 डिसेंबर 2016 रोजी रात्री 7.30 ते 7.45 वाजेच्या दरम्यान कन्नड तालुक्यातील सायगव्हाण ते वडगांव गावादरम्यान अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमीवर औरंगाबाद येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला झिरो नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी जानुबा आसाराम गोरे (27) व योगेश रेवनाथ गोरे दोघे रा. वाकी ता. कन्नड जिल्हा औरंगाबाद हे दोघे चुलत भाऊ औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत नोकरीला होते व औरंगाबाद येथेच राहत होते. सुटी निमीत्त दोघे जण वाकी गावी घरी आले होते व नातेवाईकांना भेटण्यासाठी पाचोरा तालुक्यातील नेरी वडगांव येथे मोटारसायकलवरुन गेले होते दि 18 डिसेंबर 2016 रोजी घराकडे मोटारसायकलवरून परतत असतांना कन्नड तालुक्यातील सायगव्हाण व वडगांव गावादरम्यान त्यांच्या मोटारसायकलचा अपघात होवुन रात्री 7.30 ते 7.45 वाजेदरम्यान जानुबा आसाराम गोरे (27) याचा डोक्याला जबर मार लागुन जागेवर मृत्यू झाला तर योगेश रेवनाथ गोरे हा डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला असुन त्याला जखमी व बेशुद्ध अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र प्रकृती गंभीर असल्याने परदेशी यांच्या रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मयत व जखमिच्या नातेवाईकांनी दिली आहे.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला झिरो नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास चाळीसगाव पोलीस करीत आहेत.