मोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी याव्यात!

0

लठ्ठपणा नियंत्रणासाठी राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : ओबेसिटी मंत्र हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तींना महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा (ओबेसिटी) हा आजार आहे हे आपणास माहीत नव्हते. यासाठी टास्क फोर्स स्थापन करून विशेषत: चाईल्ड ओबेसिटीवर शासन पातळीवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. शिवाय मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी मोठ मोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी यायला हव्यात. त्यातून काय खावे हे समजेल. जंक फूडबाबतही समाजात जागृती होण्यासाठी शासनस्तरावर कारवाई करण्यात येईल, असे देखील सांगितले. राजभवन येथे विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित व लेखिका डॉ.जयश्री तोडकर व पत्रकार संतोष शेनॉय लिखित ‘ओबीसिटी मंत्र’या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी राज्यपाल श्री. चे विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान – राज्यपाल
लठ्ठपणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा लठ्ठ माणूस चेष्टेचा विषय ठरतो, त्याला त्याचा कमीपणा वाटतो. शहरी भागात मधूमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. राज्यपाल राव म्हणाले, आपला देश हा 29 वर्षांखालील तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे युवा वर्गाचे फार मोठं नुकसान होईल. त्यांच्यात जागृती आणायला हवी.