मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांसाठी निधी देण्यासाठी प्रयत्नशील

0

अतुल बेनके : जिल्हा परिषदेच्या निमगिरी शाळेचा शताब्दी महोत्सव

जुन्नर । आदिवासी भागात असलेल्या शाळांच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांसाठी जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन युवा नेते अतुल बेनके यांनी निमगिरी येथे दिले. जिल्हा परिषदेच्या निमगिरी शाळेस 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या शताब्दी महोत्सव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

निमगिरी शाळेने आदिवासी समाजाचा पहिला आय.ए.एस अधिकारी दिला. गोविंद गारे त्यांचे नाव. याची जाणीव ठेवून गारे यांनी शेवटचा श्‍वास घेईपर्यंत आदिवासी समाजासाठी काम केले. यावेळी गोविंद गारे यांना मरणोत्तर निमगिरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचा सार्थ अभिमान वाटतो, असे बेनके यांनी यावेळी सांगितले. या शाळेत काम केलेल्या गुरुजनांचा व माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

निधी उपलब्ध करून देणार!
ई लर्निंग व संगणक कक्षाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जि. प. चे माजी अध्यक्ष देवराम लांडे, पंचायत समिती सदस्य काळूशेठ गागरे, काळू शेळकंदे, दादाभाऊ बगाड आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेसाठी लवकरच 7-8 संगणक उपलब्ध करून देऊ, असे मारुतीशेठ वायाळ यांनी यावेळी सांगितले. निमगिरी शाळेच्या भौतिक सुविधेकरीता निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अध्यक्षीय भाषणात पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन आ. का. मांडवे यांनी तर आभार सुदाम भालिंगे यांनी मानले.