‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’; नुकसानग्रस्तांची उभे राहण्याची धडपड!

0

शिक्रापूर (मंदार तकटे) । शिरुर तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात कधीच मोठा अनुचित प्रकार आजतागयत घडलेला नाही. परंतु कोरेगाव भीमा येथे अचानक दंगल उसळली अन् तालुक्याच्या या ओळखीला तडा गेली. कोरेगाव भीमा येथील दंगलीचे लोण सणसवाडी गावात आले. या ठिकाणी जमावाने जाळपोळ केली. दगडफेक केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच ठिकाणी स्थानिक तरुणाला जमावाच्या मारहाणीत नाहक जीव गमवावा लागला. आता स्थानिक सावरू लागले आहेत. मोठ्या कष्टातून उभा केलेला व्यवसाय पुन्हा सावरण्यासाठी व्यवसायिकांनी कंबर कसली आहे. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’ या काव्य पंक्तीची येथे आठवण होते. यातून नुकसानग्रस्तांची उभे राहण्याची धडपड दिसून येते.

अन् घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले
कोरेगाव भिमा येथे सुरुवातीला दगडफेक करण्यात आली. यानंतर जमाव अधिकच प्रक्षुब्ध होत गेला. जाळपोळ सुरू झाली. त्याचबरोबर दिसेल ती गाडी फोडण्यात, जाळण्यात येत होती. अनेक स्थानिकांची दुकानेही जाळण्यात आली. या जाळपोळीत संपुर्ण नुकसान झालेल्या भांड्यांचा व्यवसाय करणारे प्रविण मुथा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या थरारक प्रसंगाचे वर्णन केले. कोरेगाव भीमा गावापासून काही अंतरावर असणार्‍या स्टेट बँकेजवळ मुथा यांचे दुकान होते. दुकानाला आग लागल्याचे समजातच त्यांनी बाहेर पाहिले असता आगीचे प्रचंड लोट दिसत होते. तोपर्यंत त्यांचे घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. घरात पत्नी आणि 25-27 वयाची मतिमंद मुलगीही होती. यांना बाहेर निघता येत नव्हते. स्थानिकांनी शिडीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले. मुलीचा जीव कसाबसा वाचला. यात त्यांच्या संपूर्ण व्यवसायासह संसाराची राख-रांगोळी झाली. घालायला कपडेही शिल्लक राहिली नसल्याचे मुथा यांनी सांगितले.

शून्यातून उभे राहण्याचे प्रयत्न
जयेश शिंदे यांनी बोलताना सांगितले की, अत्यंत गरीबीत दिवस काढत व्यवसाय उभा केला होता. दंगलीत संपुर्ण व्यवसायाचीच राख झाली. त्यांच्या शोरुमसमोरील सर्वच गाड्यांना आगी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या गाड्यांची नुकसानभरपाई कशी द्यावी, हा मोठा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. भुजबळ यांनी मोठ्या कष्टातून सणसवाडीत श्रीराम मिसळ नावाने हॉटेल सुरू केले होते. हा व्यवसाय आताशी कुठे प्रगतीपथावर येत होता. परंतु दंगलीत हॉटेलमधील सर्व सामानाची मोडतोड झाली. पुन्हा शुन्यातून सगळे उभे करण्यासाठी भुजबळ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.