मोदींचा पुढील आठवड्यात चीन दौरा

0

डोकलाम सीमावादानंतर पहिलीच बैठक होणार

पेईचिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 27 आणि 28 एप्रिलला चीनचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अनौपचारिक शिखर बैठक होणार आहे. भारत-चीनमधील संयुक्त पत्रकार परिषदेत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी डोकलाममध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील ही पहिलीच बैठक आहे.

सुषमा स्वराज चीन दौर्‍यावर
संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात बैठक झाली. दोन्ही देशातील द्वीपक्षीय संबंध सुधारण्यावरील प्रक्रियेला वेग देण्यावर बैठकीत चर्चा झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी सुषमा स्वराज सध्या चार दिवसांच्या चीन दौर्‍यावर आहेत. यासाठी स्वराज कालच चीनमध्ये दाखल झाल्या. चीनच्या नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या समारोपाच्या पूर्व संध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन केला होता. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. विचारांची देवाण-घेवाण करत भारत-चीन संबंध आणखी सुधारण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले, असे वांग यांनी सांगितले.