निवडणूक ही विकास, रोजगार, महागाई आणि शासकीय योजनांच्या मुद्द्यांवर लढविली जाते. पण, गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत यापैकी दुर्दैवाने काहीच दिसून आले नाही. एकमेकांची उणीदुणी, अत्यंत खालच्या स्तरावरील आरोप, सेक्स व्हिडीओ, वैयक्तिक टीका अशा चिल्लर मुद्यांवर गुजरात विधानसभेची निवडणूक लढविली गेली. यामुळे गुजरातच्या नागरिकांना बहुतेक बेपत्ता झालेल्या वेड्या विकासला शोधण्यातच पुढील पाच वर्षे घालवावी लागतील असे दिसते. या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहा विरूद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जुगलबंदी होणे अपेक्षित होते. मात्र तसे कुठेच दिसले नाही.
अमित शहांना एकट्याला गुजरात निवडणूक भारी पडणार हे ओळखल्यानेच मोदींना पुर्णवेळ या निवडणुकीला द्यावा लागला. अनुभवी ज्येष्ठ नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी यांनी चांगलाच घाम फोडला. राहुल गांधीची पप्पू म्हणून चेष्टा करणार्या भाजपला अखेर राहुल यांनी चांगलीच टक्कर दिली. गुजरात निवडणुक ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. भाजपसाठी म्हणण्यापेक्षा ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम करणारीही होती. त्यामुळे या दोघांनी अगदी वाट्टेल त्या मार्गाने ती जिंकायचीच असा पणच केल्याचे समस्त देशाने अनुभवले. मोदी गजरातमध्ये फारतर दोन-तीन सभा घेतील अशी सुरूवातीस अटकळ होती. परंतु, पुढे भाजपच्या हृदयाचे ठोके वाढत गेले…आणि मोदींनी गुजरातच्या रणांगणावर तळच ठोकला!
या निवडणुकीची सुरूवातच इतकी वाईटपद्धतीन केली गेली की अनेकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. एक-दोन नव्हे तब्बल पाच सेक्स व्हिडीओ निवडणुकीच्या रणधुमाळीत व्हायरल करून हार्दिक पटेलला संपविण्याचे घाणेरडे राजकारण केले गेले. त्यातच पाटीदार नेत्यांना पैसे देऊन विकत घेण्याचाही प्रयत्न उजेडात आला. याप्रकरणाचे पुढे काय झाले हे मात्र निकालापर्यंत समजले नाही तो भाग वेगळा. विशेष म्हणजे या निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिकाही मनात शंका निर्माण करणारी होती याचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. टी. एन. शेषन यांनी निवडणूक आयोगाला मिळवून दिलेला विश्वास, प्रतिष्ठेला कुठेतरी तडा गेला की काय असेदेखील यानिमित्ताने वाटले. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापासून ते विविध आक्षेपार्ह बाबींकडे आयोगाने दुर्लक्ष केल्यासंबंधीचे विरोधकांनी केलेले आरोप पाहात ते जाणवले.
काँग्रेसला सध्या देशभरात वाईट दिवस आहेत असेच वातावरण गुजरात, हिमाचल निवडणुकीच्या तारखा जाहिर होईपर्यंत होते. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर हे वातावरण बदलण्यात राहुल यांना चांगलेच यश आले. राहुल आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसची विचारधारेला बगल दिल्याचेही दिसले. कारण, मोदी प्रत्येक प्रचारदौर्यात मंदिरांना भेटी देतात म्हणून राहुल यांनीही तोच सपाटा लावला. भाजपशी सुतराम संबंध नसणारे महात्मा गांधी, सरदार पटेलांचे नाव सातत्याने घेऊन राजकारण करणार्या मोदींना राहुल यांनी त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले. राहुल यांच्या मंदिरभेटींचा भाजपने इतका धसका घेतला की राहुल हे हिंदूच नाहीत, असा आरोप केला गेला. त्यावर काँग्रेसवाल्यांनीही राहुल हे कसे जानवेधारी अस्सल हिंदू आहेत असे ठासून सांगत पुरावेदेखील सादर केले. हे सर्वच मनोरंजनात्मक होते हे मात्र खरे. यासर्व रणधुमाळीत वेडा विकास मात्र कुठेच दिसला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेत्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी ते कसे पाकशी संबंधीत आहेत, दिल्लीत कशी गुप्त बैठक झाली, असे पिल्लूच सोडले. शहाण्या मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नसला तरी देशातील एका राज्याची निवडणूक पाकिस्तानशी जोडण्याची वेळ केवळ राहुल गांधी यांनीच मोदींवर आणली. 2012 साली गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 115, काँग्रेसला 61 आणि इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या. 2017च्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 150 जागा मिळण्याचे स्वप्न पाहिले होते. शहा यांचे हे स्वप्न काही पुरे होऊ शकले नाही. गुजरात निवडणुकीत भाजपला नोटाबंदी, जीएसटी, रेरा, अडचणीत आलेले उद्योग-धंदे आणि रोजगार निर्मितीत आलेले अपयश याचा चांगलाच फटका बसला आहे. यामुळेच काँग्रेसची वाट सुकर झाली. गुजराती जनतेची नाराजी दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपने आरोप-प्रत्यारोपांमध्ये आणि सुडाच्या राजकारणातच जास्त रस दाखवला. परिणामी मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाड्यात उतरूनदेखील पदरी पडलेला हा चुटपुटता विजय भाजपसाठी नव्हे तर मोदी यांच्यासाठी अधिक मनाला चटका लावणारा आहे. जीता विकास, जीता गुजरात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असली तरी मिळालेला विजय हा भाजपसाठी उत्साहवर्धक नक्कीच नाही. उलट भाजच्या या विजयातून राहुल यांच्यारूपाने काँग्रेसला पक्षविकासाची वाट पुन्हा दृष्टीक्षेपात आली आहे.
राहुल यांनी उभे केलेले आव्हान आणि दिलेली कडवी झुंज यामुळे भाजपला गुजरातमध्ये मागील निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्या. गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राहुल गांधी यांना काँग्रेसचे पक्षाध्यक्षपद मिळाले. तसेच याच निवडणुकीत त्यांनी आपली प्रतिम अधिक आक्रमक केली. राहुल यांना कमी लेखण्याची चूक यापुढे भाजप करणार नाही. ज्यांच्या खांद्यावर पक्षाची धूरा आहे त्याच मोदींना राहुल यांनी काँटे की टक्कर दिली आहे. आगामी 2019च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आपण सज्ज असल्याचे राहुल गांधी यानिमित्ताने दाखवून दिले असून हा भाजपसाठी हा धोक्याचा इशारा आहे. 2019च्या निवडणूकीतही गुजरात निवडणूकीप्रमाणे राहुल यांनी मोदींना टक्कर दिली तर भाजपला ती निवडणूक कठीण जाऊ शकते. गुजरात निवडणुकीत मोदी लाटेला ओहोटी लागल्याचे दिसत असले तरी मोदींचा थाट चुटपुटत्या विजयाने कायम राखला गेला. म्हणूनच मोदींची झालेली ही दमछाक हाच राहुल यांचा विजय आहे.
सामान्य जनता मोदींच्या पाठिशी
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे सामान्य माणूस मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा पुरावा आहे, अशी प्रतिक्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतील यशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे आणि सामान्य जनतेचे आभार मानले. फडणवीस म्हणाले, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला मिळालेले यश अभूतपूर्व आहे. भाजपविरोधात अनेक गोष्टी पेरण्याचा प्रयत्न झाला, रान उठवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मतदारांनी भाजपलाच साथ दिली. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की, देशाच्या प्रत्येक राज्यातील सामान्य माणूस मोदीजींच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. या देशाला प्रगतीपथावर नेण्याची किंवा सामान्य माणसाचे भाग्य बदलण्याची क्षमता मोदींच्या नेतृत्त्वाच असल्याची बाब सामान्यांना पटली आहे. त्यामुळेच सामान्य जनतेने भाजपच्या विकासाच्या आणि विश्वासाच्या राजकारणाला प्रतिसाद दिला. 22 वर्षांनंतरही गुजरातमध्ये भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला. भाजपला याठिकाणी एकूण 50 टक्के मते मिळाली. आतापर्यंत जनतेने कोणत्याही पक्षावर इतका विश्वास दाखवला नव्हता. यानिमित्ताने जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
सामान्य जनता मोदींच्या पाठिशी
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे सामान्य माणूस मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा पुरावा आहे, अशी प्रतिक्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतील यशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे आणि सामान्य जनतेचे आभार मानले. फडणवीस म्हणाले, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला मिळालेले यश अभूतपूर्व आहे. भाजपविरोधात अनेक गोष्टी पेरण्याचा प्रयत्न झाला, रान उठवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मतदारांनी भाजपलाच साथ दिली. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की, देशाच्या प्रत्येक राज्यातील सामान्य माणूस मोदीजींच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. या देशाला प्रगतीपथावर नेण्याची किंवा सामान्य माणसाचे भाग्य बदलण्याची क्षमता मोदींच्या नेतृत्त्वाच असल्याची बाब सामान्यांना पटली आहे. त्यामुळेच सामान्य जनतेने भाजपच्या विकासाच्या आणि विश्वासाच्या राजकारणाला प्रतिसाद दिला. 22 वर्षांनंतरही गुजरातमध्ये भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला. भाजपला याठिकाणी एकूण 50 टक्के मते मिळाली. आतापर्यंत जनतेने कोणत्याही पक्षावर इतका विश्वास दाखवला नव्हता. यानिमित्ताने जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
शिवसेनेला आत्ता तरी जाग येईल?
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेवर निशाणा साधला. सोमय्या म्हणाले, गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार, जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबई महापालिका निवडणुकीपासून किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली आहे. आता गुजरात निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी शिवसेनेलाच टार्गेट केले. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कसे उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. गुजरातमध्ये शिवसेनेने 40हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. सुरुवातीला शिवसेनेने उमेदवार देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर 40 उमेदवार उभे करत भाजपची डोकेदुखी वाढवली होती. पण या सगळ्यावर मात करत भाजपने गुजरातची सत्ता राखली.
गुजरातमधील जनता भाजपवर नाराज
निवडणूक निकालाचे कल पाहाता गुजरातमधील जनता भाजपवर नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, गुजरात विकासाचा दाखला देत, भाजप देशात सत्तेत आली. पण निकालावरुन, गुजरातमधील जनता भाजपवर खुश नसेल, तर याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. देशाची सुरक्षा, काश्मीर मुद्दा, नोटाबंदी, बेरोजगारी आणि शेतकर्यांच्या आत्महत्या, आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधूनही राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले आहे. सध्या काँग्रेसची अतिशय बिकट अवस्था आहे. अशावेळी काँग्रेसची धूरा राहुल गांधींच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात काहीच गैर नाही. त्यांनी निवडणूक निकालाची परवा न करता, स्वत: ला प्रचाराच्या आखाड्यात स्वत:ला झोकून दिले होते.
परिस्थिती आणखी बदलेल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परिस्थिती आणखी बदलेल. सुरूवातीला भाजपचे काही नेते म्हणत होते गुजरातमध्ये 150 जागांशिवाय बोलूच नका, पण सुरूवातीला जेव्हा निकाल आले, तेव्हा काही काळ काँग्रेसने आघाडी घेतली होती, हे सर्व जगाने पाहिले, आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे हे यानिमित्ताने दिसून आले. मी सांगेल ती पूर्वदिशा हे जनता कदापी सहन करत नाही. येणार्या काळात देशात निश्चितच मोठा बदल जनता घडवेल.