मोदींची वागणूक पाकिस्तानच्या पंतप्रधानासारखी – अरविंद केजरीवाल

0

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण करत आहे. यावेळी देशातील सर्व मोदी विरोधी नेते त्यांची भेट घेत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील त्यांची भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना योग्यप्रकारे वागणूक देत नसल्याचा आरोप केला.

‘मी पंतप्रधानांना एवढेच सांगू इच्छितो की, ते केवळ भाजप पक्षाचे पंतप्रधान नाहीत तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना ते सापत्न वागणूक देतात. ही सगळी परिस्थिती पाहून ते भारताचे नव्हे तर पाकिस्तानचेच पंतप्रधान आहेत, असे वाटू लागल्याची खोचक टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची ( आप) सत्ता आल्यापासून भाजपशी त्यांचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. अनेकदा हा संघर्ष विकोपालाही गेला होता. केंद्र सरकार ‘आप’ सरकारच्या कारभारात राज्यपालांकरवी हस्तक्षेप करत असल्याची तक्रार अनेकदा केजरीवाल यांनी केली होती.

याशिवाय, सध्या केंद्र सरकार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणत असल्याची चर्चा सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची वादग्रस्त प्रकरणांमध्ये सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांकडून शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कारवाईला आक्षेप घेत केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन केले होते. यावरून देशभरात मोठी खळबळ माजली होती.